भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे

मुंबई – भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. गोरे यांच्या विरोधात भूमीची खोटी कागदपत्रे बनवून फसवल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.

एका गावातील एका भूमीची खोटी कागदपत्रे सिद्ध करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटूगडे, महेश पोपट बोराटे यांच्यासह एकूण ६ जणांच्या विरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये एका तलाठ्याचाही समावेश असून तो फरार आहे. या प्रकरणात अटक होऊ नये; म्हणून गोरे यांनी यापूर्वी वडूज जिल्हा सत्र न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे, यासाठी या निकालाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. दोन आठवडे गोरे यांच्या विरोधात अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.