ढोंगी हिंदुत्वाकडून असली हिंदुत्वाकडे प्रवास चालू होवो ! – मनसे

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा !

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे १५ जून या दिवशी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याविषयी मनसेने त्यांच्यावर ‘ढोंगी हिंदुत्वाकडून असली हिंदुत्वाकडे प्रवास चालू होवो’, अशी टीका केली आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी या दौऱ्याविषयी ट्वीट करत म्हटले, ‘अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरून असली हिंदुत्वाकडे असणारा प्रवास चालू होवो ! औरंगाबादचे नाव संभाजीनगर होवो, मशिदीवरचे भोंगे उतरू देत आणि रस्त्यावरील नमाज बंद करण्याचे धाडस यांच्यात येऊ दे. विधानपरिषदेत तरी एम्.आय.एम्. आणि स.पा.चे साहाय्य न घेण्याची यांना सुबुद्धी मिळो.’’


राजकीय लाभासाठी अयोध्येची भूमी कधीच वापरणार नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

 

शिवसेनेचे नेते संजय राऊत

मुंबई – अयोध्येची भूमी ही सर्वांना ऊर्जा आणि प्रेरणा देणारी असून राजकीय लाभासाठी या भूमीचा कधीच वापर करणार नाही, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी माहिती देतांना ते बोलत होते.  संजय राऊत पुढे म्हणाले की, हा दौरा पूर्वनियोजित आहे. अयोध्या ही पवित्र आणि मंगलमय भूमी आहे. अयोध्येतून सर्वांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. त्यामुळे त्या ठिकाणी कोणतेही राजकीय प्रदर्शन करणार नाही.