संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर आणि मूर्ती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण !

प्रथमच पंतप्रधान देहू (पुणे) येथे येणार, राज्यभर ‘हाय अलर्ट’

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून या दिवशी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर आणि मूर्ती यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान देहू येथे येणार असल्याची माहिती देहू संस्थानने दिली आहे. या पार्श्वभूमीवर घातपात घडू नये, तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव केंद्रिय यंत्रणांच्या सूचनांनंतर पुणे, मुंबई यांसह संपूर्ण राज्यात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाकेबंदी, तसेच मुंबईत दाखल होणारी वाहने, संशयित वाहने यांची पोलिसांकडून कसून पडताळणी करण्यात येत आहे. २ दिवस हा अलर्ट जारी करण्यात आला असून रात्री ठिकठिकाणी पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे.

ज्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान देहूमध्ये येणार आहेत, त्या मंदिराची पायाभरणी प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती असतांना केली होती. दगडावर कोरीव काम करून संपूर्ण मंदिर बांधले आहे. त्यामुळे संपूर्ण देहूवासी, देहू संस्थान, वारकरी संप्रदाय यांचे मंदिराच्या लोकार्पणाकडे लक्ष लागले आहे.

संत तुकाराम महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी २ दिवस बंद !

लोकार्पण सोहळ्यासाठी १४ जून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव १२ ते १४ जून या कालावधीत देहू गाव येथील मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद रहाणार आहे, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानने दिली आहे.