सातारा, ९ जून (वार्ता.) – राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्तपणे आणि अविचाराने वाहन चालवणारे, तसेच विनाहेल्मेट, चुकीच्या दिशेने वाहन चालवणारे दुचाकी वाहनचालक या सर्वांवर धडक कारवाई करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. (अशी सूचना का द्यावी लागते ? पोलिसांचे काही कर्तव्य नाही का ? – संपादक) मुंबई येथील मंत्रालयात गृहराज्यमंत्री देसाई यांनी बैठक घेतली. बैठकीला संबंधित विभागाचे प्रधान सचिव, उपसचिव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्र्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणार ! – अजयकुमार बन्सल, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्यात जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, सातार शहर, कराड शहर आणि महामार्गालगत असणाऱ्या पोलीस ठाण्यांतील वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांची पथके सिद्ध करून महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावण्यात येईल, तसेच महामार्ग पोलीस साहाय्यता केंद्र भुईंज आणि कराड यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवून गृहराज्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल.’’