पुणे – महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती ठेकेदारांच्या वतीने करण्यात आली आहे; मात्र या सुरक्षारक्षकांना ३ मासांपासून वेतन दिले गेले नाही. या नैराश्यातून टिळक रस्ता क्षेत्रिय कार्यालयातील सुरक्षारक्षक अश्विन पवार यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकाराचा ‘राष्ट्रीय मजदूर संघा’ने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सुरक्षारक्षक नेमण्याचे कंत्राट ‘क्रिस्टल’ या आस्थापनाला देण्यात आले आहे. या संस्थेने १ सहस्र ५०० सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे; मात्र या आस्थापनांच्या विरोधात सुरक्षारक्षकांना कामगार कायद्यांतर्गत कोणतीही सुविधा देण्यात येत नसल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या असून पालिकेतील अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आस्थापनाला पाठिशी घालत आहेत. (कामगार तक्रारी देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या असंवेदनशील अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक)
संपादकीय भूमिकावेतन न दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न करावा लागणे, हे दुर्दैवी आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कामगारांच्या समस्या वेळीच सोडवणे अपेक्षित आहे ! |