आध्यात्मिक आईप्रमाणे साधकांना आधार देणाऱ्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे !

आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) यांची कोल्हापूर जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा कोठावळे

सौ. वैष्णवी साळोखे, तात्यासाो मोहिते कॉलनी, कोल्हापूर.

१. सेवेची तळमळ आणि चिकाटी असणे : शिल्पाताई हिंदु राष्ट्रजागृती सभा, साधनेविषयी प्रवचन आणि शिबिर यांमध्ये सहजतेने अन् सर्वांना समजेल, अशा सोप्या शब्दांत विषय मांडतात. यामध्ये काही चुकले, तर त्यांच्यामधे ते सुधारण्याची तळमळ आणि चिकाटी असते.

२. साधकांना साहाय्य करून प्रेरणा देणे : ‘त्यांचे साधनेचे प्रयत्न पाहून आम्हालाही प्रयत्न वाढवायला हवेत’, याची जाणीव होते. विज्ञापने मिळवण्यासाठी आणि ‘सनातन पंचांग’ वितरणासाठी त्यांनी संपर्क केल्यावर त्यांचा उत्साह अन् तळमळ पाहून आम्हाला प्रेरणा मिळते. त्या साधकांचे कौशल्य पाहून त्यांना सेवा देतात. सेवेच्या अंतर्गत येणाऱ्या अडचणी विचारल्यावर त्या आम्हाला लगेच साहाय्य करतात.

३. भाव : कोरोना महामारीमुळे असलेल्या दळणवळण बंदीमध्ये पहाटे नामजपापूर्वी त्या भावार्चना सांगायच्या. त्या वेळी ती भावार्चना अंतर्मनापर्यंत जाऊन दिवसभर त्याप्रमाणे माझ्याकडून प्रयत्न व्हायचे.

सौ. मेघमाला संतोष जोशी, कोल्हापूर

१. नम्रता आणि त्यांच्याविषयी सहसाधिकांना आधार वाटणे : शिल्पाताईंमध्ये मागील बऱ्याच दिवसांपासून पुष्कळ पालट होत आहेत’, असे मला जाणवले. ताईंच्या बोलण्यात नम्रता वाढली आहे. आम्हा साधकांना ताईंचा आधार वाटू लागला आहे. ताई मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आधार देतात. ताई सांगत असलेली सूत्रे अंतर्मनात पोचत आहेत आणि त्यात सहजता आली आहे’, हे मला जाणवत होते. ताईंनी सांगितलेली सेवा काही कारणामुळे आमच्याकडून पूर्ण झाली नाही, तर त्या त्यामागची कारणे समजून घेतात आणि त्यावर योग्य उपाययोजना सांगतात.

२. ‘कोरोना’ संसर्गाच्या आजारपणात साधिकेला साहाय्य करणे : मला ‘कोरोना’चा संसर्ग झाल्यामुळे मी आजारी असतांना (डॉ.) शिल्पाताई सेवेत व्यस्त असतांनाही मला भ्रमणभाष करायच्या. ‘अजून काही साहाय्य हवे आहे का ?’, असे विचारून त्यांनी ‘मला घरीच चांगले उपचार मिळतील’, असे नियोजन केले. आजारपणामुळे माझ्या मनात नकारात्मक विचार यायचे, तेव्हा ताई माझ्याशी बोलल्यावर माझे मन सकारात्मक होत असे. तेव्हा ‘ताईंची आध्यात्मिक पातळी वाढली आहे’, असे मला वाटायचे. नंतर त्यांचे यजमान रुग्णाईत असतांनाही त्या पुष्कळ स्थिर आणि शांत होत्या. त्यांच्याकडे बघून ‘हे सर्व सहन करण्याची शक्ती केवळ साधनेने येऊ शकते’, हे मला शिकता आले.

सौ. विद्या कदम, कसबा बावडा, कोल्हापूर.

आध्यात्मिक आईप्रमाणे साधकांना समजून घेणे : शिल्पाताई यांच्या पतीचे निधन झाले, त्या दिवसापर्यंत त्या आमच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा घेत होत्या. त्या बोलत असतांना त्यांच्या कुटुंबावर असलेल्या दुःखाचा लवलेशही जाणवत नसे. पूर्वी मला त्यांच्याशी बोलतांना किंवा काही विचारतांना ताण येत असे; पण आता त्यांचा समजून घेण्याचा भाग वाढला आहे. ‘त्या आमच्या आध्यात्मिक आई आहेत’, असे मला वाटते.

श्री. प्रसाद कुलकर्णी, मलकापूर, कोल्हापूर.

धर्मात सांगितल्यानुसार पतीची सेवा करणे आणि मुलावर साधनेचे संस्कार करणे : शिल्पाताई धर्मात सांगितलेल्या कृती आचरणात आणतात. त्यांनी त्यांचे पती आधुनिक वैद्य नितीन कोठावळे यांची सेवा करून पत्नीधर्माचे पालन केले. मुलगा, आधुनिक वैद्य कौशल यांच्यावर साधनेचे संस्कार करून आदर्श मातेचा धर्म निभावला.

सौ. साधना गोडसे, पाचगाव, कोल्हापूर.

आध्यात्मिक पातळी वाढल्याविषयी पूर्वसूचना मिळणे : जानेवारी २०२१ पासून शिल्पाताईंच्या बोलण्यात पालट जाणवत होता. त्या आता फार नम्रपणे बोलत असतात आणि इतरांची आपुलकीने चौकशी करतात. त्या वेळी मला ‘ताईंची आध्यात्मिक पातळी आता वाढली आहे’, असे जाणवले.

कोल्हापूर जिल्ह्यातील साधक

जिल्ह्यातील सर्व साधकांना आईप्रमाणे साधनेत साहाय्य करणे : आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पाताई म्हणजे ‘जिल्ह्यातील सर्व साधकांची आई आहे’, असे आम्हाला वाटते. मागील बऱ्याच दिवसांपासून ताईंमध्ये पुष्कळ पालट होत आहेत. आम्हा साधकांना ताईंचा आधार वाटतो. त्यांचा ‘स्वतःकडून होणाऱ्या चुका सांगणे आणि त्या स्वतः कुठे अल्प पडतात ?’, हे सांगण्याचा भाग वाढला आहे. ताई आम्हाला जी सूत्रे सांगतात, ती आमच्या अंतर्मनात पोेचतात. ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे आम्हाला वाटते आणि त्यातून आनंद जाणवतो.

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक ३०.९.२०२१)