परिचारिकांच्या बेमुदत काम बंदला ‘मार्ड’चा पाठिंबा !

संपात सहभागी परिचारिका

नागपूर – विविध मागण्यांसाठी राज्यातील परिचारिका २८ मेपासून बेमुदत संपावर आहेत. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने चालू केलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र राज्य निवासी आधुनिक वैद्यांसह केंद्रीय मार्डनेही संपाला पाठिंबा घोषित केला. ‘आधी संप मागे घ्या, मग चर्चा करू’, असे आरोग्य सचिवांचे म्हणणे आहे. त्यामुळे बोलणी फिस्कटली आहे. ‘आपण समवेत बसून मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढू, अशी आमची भूमिका आहे’, असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय शाखेचे सचिव जुल्फी अली यांनी सांगितले.

संपामुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील रुग्णसेवा यांवर ताण आहे. रिक्त जागांमुळे अनेक ठिकाणी दोन तृतीयांश निवासी आधुनिक वैद्य काम करत आहेत. त्यांनाच परिचारिकांची कामे करावी लागत आहेत. परिणामी सर्वांवरच कामाचा ताण येत आहे. ‘सरकारने याविषयी जलदगतीने प्रक्रिया राबवावी’, अशी मागणी निवासी आधुनिक वैद्यांच्या मार्ड संघटनेचे राज्य अध्यक्ष अविनाश दहिफळे यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

स्वार्थासाठी रुग्णांची हेळसांड होत आहे, हे परिचारिकांनी लक्षात घ्यायला हवे, ही अपेक्षा !