पुणे – कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पुण्यात होणार्या सुनावणीच्या काळात साक्षीदार म्हणून ६ आणि ७ जून या दिवशी उपस्थित रहाण्यासाठी ‘समन्स’ बजावले आहेत. आयोगाचे सचिव व्ही.व्ही. पळणीटकर यांनी राव यांना समन्स बजावल्याला दुजोरा दिला आहे. हा हिंसाचार झाला, तेव्हा राव हे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. राव यांच्यासह निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी मानद कॅप्टन बाळासाहेब जमादार तसेच ३ पोलीस अधिकार्यांनाही आयोगाने साक्ष देण्यासाठी पाचारण केले आहे. १ जानेवारी २०१८ या दिवशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन्. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील २ सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. राव यांनी विशेष सरकारी अधिवक्ता शिशिर हिरे यांच्या वतीने आयोगासमोर प्रतिज्ञापत्र प्रविष्ट केले आहे. त्यात प्रामुख्याने वर्ष २०१८ मध्ये कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ परिसरात होणार्या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सिद्धतेविषयी माहिती आहे.