नवी देहली – केंद्र सरकारने गव्हानंतर आता साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध आणले आहेत. देशांतर्गत साखरेची उपलब्धता आणि दर स्थिर राखण्यासाठी सरकारने केवळ १०० लाख मेट्रिक टनापर्यंतच साखरेच्या निर्यातीला अनुमती देण्याचा निर्णय घेतला. १ जून २०२२ पासून ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सांगितल्यानंतरच साखरेच्या निर्यातीला अनुमती दिली जाईल. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
किरकोळ बाजारात साखरेचा भाव ३६ ते ४४ रुपये प्रतिकिलो
देशात साखरेचा घाऊक भाव ३ सहस्र १५० रुपये ते ३ सहस्र ५०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे, तर देशाच्या विविध भागांतील किरकोळ बाजारात साखरेचा किलोमागे भाव ३६ ते ४४ रुपये इतका आहे.