‘सारथी संस्थे’ला भूखंड देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमत !

३ सहस्र ५०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड मिळणार

मुंबई – छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) नवी मुंबई येथील केंद्रासाठी भूखंड देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

या बैठकीत सारथीला नवी मुंबई येथील केंद्रासाठी खारघर येथे ३ सहस्र ५०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यामध्ये हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याने हरभरा खरेदीचा कालावधी २८ जूनपर्यंत वाढवण्याची विनंती केंद्राकडे करण्यात आली आहे, अशीही माहिती या वेळी देण्यात आली.

‘राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु या पाटबंधारे प्रकल्पामध्ये २५ मेपर्यंत ३६.६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात हे प्रमाण ३६.२७ टक्के एवढे होते. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे’, असेही या वेळी सांगितले.

‘मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये संथ गतीने वाढ होत असल्याने राज्यातील जनतेने मुखपट्टी वापरावी. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या अल्प असली, तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.