नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २१ ते २८ मे २०२२ या कालावधीत प्रतिदिनची लेखमाला…

साहित्याच्या सर्वच प्रांतात साहित्य निर्मिती करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केवळ तीनच नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आणि संपन्न केली आहे. सावरकर यांच्या नाटकांचे विषय हृदयाला सतत जाळणारे, मस्तकाला सतत चिंतनाचे खाद्य पुरवणारे आणि कृतीप्रवण करणारे आहेत.

१. वर्ष १९२७ मध्ये संगीत ‘उःशाप’ हे पहिले नाटक सावरकर यांनी लिहिले. त्याचा मुख्य विषय ‘अस्पृश्यता निवारण झाले पाहिजे’, हा आहे.

२. वर्ष १९३१ मध्ये सावरकर यांचे ‘संन्यस्त खङ्ग’ हे नाटक आले. याचे प्रयोग ‘बलवंत नाटक मंडळ’ यांनी सादर केले. या नाटकात ‘शब्द शक्तीचे महत्त्व पटवून देणे’, हा उद्देश दिसून येतो. बौद्ध धर्मातील अहिंसा तत्त्वाचा जीवनात होणारा पराभव, त्याची निष्फळता दाखवून देश सशस्त्र आणि बलसज्ज असावा, असे नाटकात सुचवले आहे. कथानकात गौतम बुद्ध यांच्या जीवनकाळातील त्यांच्याच शाक्य कुळातील प्रसंगाचे चित्रण केले आहे. बुद्ध अर्थातच संन्यास धर्म आणि अहिंसा यांचे मंडन केले आहे.

३. वर्ष १९३३ मध्ये सावरकर यांनी ‘उत्तरक्रिया’ हे नाटक लिहिले. ज्याचा प्रयोग ‘भारत भूषण संगीत मंडळ’ यांनी केला आहे. हे नाटक ऐतिहासिक आहे. यात सावरकर यांनी ‘रोटीबंदी आणि समुद्रबंदी यांनी जखडलेले हिंदु राष्ट्र या बेड्या तोडून एक प्रबळ राष्ट्र होईल’, असा आशावाद खुलवला आहे.

सावरकरांच्या तीनही नाटकांची कथा बीजे ही ध्येयवादी दृष्टीची असल्याचे जाणवते. ते स्वतः ‘नाटकाकडे केवळ आनंद निर्मिती म्हणून न पहाता संसार कसा असावा ? हेही नाटकात दाखवले पाहिजे’, असे म्हणतात.

सावरकर यांनी शस्त्र सामर्थ्यावरील अपरंपार विश्वास नाटकांद्वारे दर्शवणे

सावरकरांचा शस्त्र सामर्थ्यावरचा अपरंपार विश्वास त्यांच्या तिन्ही नाटकात जाणवतो. ‘संन्यस्त खङ्ग’मध्ये विक्रम देव म्हणतो, ‘‘पंचवीस काय, पंचवीसशे वर्षांनंतरही या जगावर या जगाच्या दुर्दैवाने शस्त्र युगाचे प्राबल्य दिसून येईल.’’

सावरकरांच्या तीनही नाटकातील पुरुष पात्रे पौरुषसिद्धीसाठी निःस्वार्थ, ध्येयवेडेपणा, तत्त्वनिष्ठ दिसतात, तर स्त्री पात्रांचेही स्त्रीत्व, सौकुमार्य, लावण्य यांपेक्षा ती दैवी, नैसर्गिक देणगीपेक्षा त्या विरांची प्रेरणा, तेजस्वी अशी दिसतात. सावरकर हे ध्येयवेडे व्यक्तीमत्त्व होते. त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या सगळ्या पात्रात दिसते.

सावरकर यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्त्वाचे प्रतिबिंब नाटकांद्वारे दिसून येणे

सावरकरांच्या प्रखर विचारांचा प्रभाव मनात ठेवून त्यांची नाटके पहातांना समीक्षक टीकाकारांनाही त्यांच्या नाट्यप्रतिभेला डावलता येत नाही. असे अनेक दाखले नाट्यसमीक्षेमध्ये सापडतात. एक प्रचारक आणि निष्ठावंत कलावंत असे अपूर्व मिश्रण सावरकरांच्या व्यक्तीमत्त्वातून जाणवते. सावरकरांच्या संपूर्ण व्यक्तीमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या नाटकातून दिसून येते.

– प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी-गिरगावकर

(साभार : मासिक ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी २०२१)