माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते गुलझारीलाल नंदा यांची निष्कामता !

काँग्रेसचे माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा

घरमालकाने भाडे न दिल्याने एका ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. त्या वृद्धाकडे जुना पलंग, काही ॲल्युमिनियमची भांडी, प्लास्टिकची बालदी यांखेरीज काहीही साहित्य नव्हते. त्या वृद्धाने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली. शेजाऱ्यांनाही वृद्धाची दया आली आणि त्यांनी घरमालकाला विनंती केली. त्यामुळे घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला. त्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीने त्याचे साहित्य आत घेतले. हा सर्व प्रकार तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने पाहिला. याविषयी आपल्या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करता येईल, असे त्याला वाटले. त्याने ‘क्रूर जमीनदार पैशासाठी म्हाताऱ्याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो’, असा एक मथळाही ठरवला. मग त्याने त्या भाडेकरूचे आणि भाड्याच्या घराचे छायाचित्र काढले.

माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांच्या दयनीय स्थितीविषयी वृत्तपत्रात बातमी छापून येणे

तो पत्रकार त्याच्या कार्यालयामध्ये गेला आणि घडलेला सर्व प्रकार वृत्तपत्राच्या मालकाला सांगितला. मालकाने चित्रे पाहिली आणि त्यांना धक्काच बसला. त्याने पत्रकाराला विचारले, ‘‘या वृद्धाला ओळखले का ?’’ पत्रकार ‘नाही’ म्हणाला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली. त्या बातमीचे शीर्षक होते, ‘भारताचे माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा, एक दयनीय जीवन जगत आहेत !’ या बातमीत पुढे लिहिले आहे, ‘माजी पंतप्रधान कसे भाडे देऊ शकले नाहीत आणि त्यांना घरातून कसे हाकलून देण्यात आले.  ‘अलीकडे फ्रेशर्सही (नुकतेच शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी) भरपूर पैसे कमावतात’, अशी टिप्पणी केली गेली. दोन वेळा पंतप्रधानपद भूषवलेल्या आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे घरही नाही.

गुलझारीलाल नंदा यांनी सरकारी निवास अन् इतर सुविधा विनम्रतेने नाकारणे आणि त्यांनी सामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगणे

वास्तविक गुलझारीलाल नंदा यांना ५०० रुपये प्रति मास भत्ता उपलब्ध होता; मात्र ‘आपण स्वातंत्र्यसैनिकांच्या भत्त्यासाठी लढलो नाही’, असे सांगत त्यांनी ते पैसे नाकारले होते. नंतर मित्रांनी त्यांना ते स्वीकारण्यास भाग पाडले. या पैशातून ते घरभाडे देऊन गुजराण करत असे. हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर लगेच तत्कालीन पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकारी यांना वाहनांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी पाठवले. एवढ्या अतीमहत्त्वाच्या लोकांच्या (‘व्हीआयपीं’चा) वाहनांचा ताफा पाहून घरमालक थक्क झाला. तेव्हाच त्याला कळले की, त्यांचे भाडेकरू श्री. गुलझारीलाल नंदा हे भारताचे माजी पंतप्रधान होते. त्याने केलेल्या अपवर्तनाविषयी खंत वाटून लगेच घरमालक गुलझारीलाल नंदा यांच्या चरणी नतमस्तक झाला. मंत्री आणि अधिकारी यांनी गुलझारीलाल नंदा यांना सरकारी निवास अन् इतर सुविधा स्वीकारण्याची विनंती केली. गुलझारीलाल नंदा यांनी ‘या वृद्धापकाळात अशा सुविधांचा काय उपयोग ?’, असे सांगून त्यांची विनंती नाकारली. शेवटच्या श्वासापर्यंत ते एका सामान्य नागरिकाप्रमाणे खरे गांधीवादी म्हणून जगले. वर्ष १९९७ मध्ये सरकारने त्यांचा ‘भारतरत्न’ देऊन गौरव केला. (कुठे माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचे निष्काम जीवन आणि कुठे सरकारी निवासाचे भाडे थकूनही अन् स्वतःजवळ अमाप संपत्ती जमवूनही सोयीसुविधा मागून घेणारे आजचे लोकप्रतिनिधी ! गुलझारीलाल नंदा यांच्या निष्काम कृतीतून शिकून आजच्या लोकप्रतिनिधींनी आचरण करावे ! – संपादक)

गुलझारीलाल नंदा (जन्म वर्ष १८९८- मृत्यू वर्ष १९९८) यांनी जवाहरलाल नेहरू, तसेच लालबहाद्दूर शास्त्री यांच्या निधनानंतर दोन्ही वेळा प्रभारी (तात्पुरत्या स्वरूपात पदभार सांभाळणे) पंतप्रधानपदाचे दायित्व सांभाळले होते, तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि अन्य मंत्रीपदेही भूषवली होती.

(साभार : ‘कुटुंब ॲप’)