महर्षींची दिव्य वाणी
‘मानवाने आतापर्यंत अनेक गोष्टींचा शोध लावला आहे; मात्र मानवाच्या लक्षात येत नाही की, त्याने शोध लावलेली प्रत्येक गोष्ट नीट चालण्यासाठी ईश्वरी आशीर्वादाची आवश्यकता आहे. मानवाने आकाशयान (विमान) निर्माण केले; मात्र ‘आकाश ईश्वराने निर्माण केले आहे’, हे तो विसरतो. मानव म्हणतो, ‘मी विमान निर्माण केले.’ देव म्हणतो, ‘अरे मानवा, मी तुला निर्माण केले आहे !’
अंतरातील भावाचे महत्त्व
‘मंदिरांत ईश्वराची, देवतेच्या मूर्तीची पूजा होत असते. मूर्तीकडे पहाणाऱ्या व्यक्तीतील भावानुसार त्या त्या देवतेचे आशीर्वाद तिला मिळतात. शिल्पकाराने एखाद्या दगडाकडे पाहिल्यावर त्याला त्या दगडात देवाची मूर्ती दिसू लागते. ‘अमुक दगडापासून कोणत्या देवतेची मूर्ती सिद्ध होईल’, हे त्या शिल्पकाराच्या लगेच लक्षात येते. आपली दृष्टी एखाद्या दगडाकडे गेल्यास आपल्याला केवळ दगड दिसतो; मात्र शिल्पकारातील भावामुळे त्याला दगडात देव दिसत असतो.’ – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९६) (३.२.२०२२)
केवळ ईश्वरालाच १०० टक्के ज्ञान असते !
‘आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणींमागचा कार्यकारणभाव आपल्या लक्षात येईलच, असे नाही. सहदेव श्रीकृष्णाला म्हणतो, ‘‘मला ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असूनही शेवटपर्यंत ‘कर्ण माझा भाऊ आहे’, हे समजले नाही.’’ तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो, ‘‘अरे सहदेवा, कुणालाही कितीही ज्ञान असले, तरी त्याला एखाद्या गोष्टीविषयी केवळ ९९ टक्केच कळू शकते. १०० टक्के केवळ मलाच (ईश्वरालाच) ठाऊक आहे.’’ – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९५ (२०.१२.२०२१)