व्हॉट अबाऊट सावरकर ?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २१ ते २८ मे २०२२ या कालावधीत प्रतिदिनची लेखमाला…

‘झी मराठी’ या वाहिनीवर काही वर्षांपूर्वी ‘नाट्यगौरव’ हा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात नाटकाचा इतिहास आणि मराठीचा महिमा सांगितला जात होता; पण ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९२५ ते १९५१ अशी २५ वर्षे मराठीसाठी आपली लेखणी झिजवली, त्यांचा उल्लेखही कार्यक्रमात होऊ नये, याचे आश्चर्य वाटले.

१. सावरकर यांच्या ‘उःशाप’ नाटकाला ब्रिटीशशासनाकडून विरोध होणे आणि त्या नाटकाला नागरिकांनी समजूतदारपणा दाखवणे

नाशिकमध्ये असतांना सावरकर म्हणाले होते, ‘‘जे काम सहस्र व्याख्यानांनी होत नाही, ते एका चांगल्या नाटकाने होते.’’ त्यांनी वर्ष १९२७ मध्ये ‘उःशाप’ हे पहिले नाटक लिहिले. ते नाटक नाट्यकला प्रसारक मंडळीने रंगभूमीवर आणले. ते नाटक सावरकरांनी स्वतः सूचना देऊन बसवले. नाटकाचा दिवस ठरला. दर्शिका (तिकिटे) विकल्या गेल्या. नाटकासाठी नाट्यगृह नव्हते. नारळाच्या झावळ्या आणि तरटाचे नाट्यगृह उभारले; पण ऐनवेळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्याने अनुमती नाकारली. रत्नागिरीच्या नागरिकांनी समजूतदारपणा दाखवून ‘शासनाने अनुमती दिली, तर आम्ही नाटक पाहू; आपले श्रम पहाता आम्ही पैसे परत मागणार नाही’, असे सांगितले. सावरकरांनी त्या वेळच्या मुंबई प्रांताधिकाऱ्यास विद्युत् संदेश (तार) पाठवून विचारले, ‘‘माझ्या लेखनात असा कोणता आक्षेपार्ह भाग आहे, ते मला कळवावे.’’ सुदैवाने नाटकास अनुज्ञा मिळाली.

२. ‘उःशाप’ नाटक पाहून नाट्यकला प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापकांनी सावरकर यांचा सत्कार करणे आणि नाटक लिखाणाची मागणी करणे

श्री. विद्याधरपंत नारगोलकर

नाट्यगृहाला आरक्षकांचा (पोलिसांचा) वेढा होता. दोन शासकीय लेखनिक नाटकातील पात्रे तेच संवाद बोलतात का ? हे पहाण्यासाठी डोळे फाडून आणि कान टवकारून बसले होते; पण ‘उःशाप’ नाटक अतिशय परिणामकारक झाले. नाट्यकला प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापकांनी सावरकरांचे आभार मानून त्यांना चांदीची दौत आणि चांदीचा दांडा असलेले सोन्याचे टोक (निब) अर्पण करून विनंती केली की, या लेखन साहित्याने त्यांनी आमच्या नाटक मंडळींसाठी नाटक लिहावे. सावरकरांनी त्यास उत्तर दिले, ‘‘लाकडाच्या दांड्याला लोखंडाचे टोक बसवून लिहिलेल्या नाटकास इतका त्रास, तर चांदीच्या दांड्याला सोन्याचे टोक बसवून लिहिलेल्या नाटकास किती त्रास !’’

३. ‘संन्यस्त खङ्ग’ नाटकाविषयीचा अनुभव

सावरकरांनी ‘संन्यस्त खङ्ग’ नाटक लिहिले. त्यातील ‘शतजन्म शोधतांना’ हे नाट्यगीत अंगावर रोमांच उभे करते. हे नाटक बलवंत नाटक कंपनीने वर्ष १९३२ मध्ये सादर केले. ‘उत्तरक्रिया’ हे त्यांचे तिसरे नाटक भारत भूषण संगीत मंडळीने सादर केले. कै. मा. दत्ताराम यांना लहानपणी एका रात्रीत ‘कीचकवध’ नाटकातील सैरंध्रीची भूमिका पाठ करवून घेऊन सावरकरांनी त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी ‘सैरंध्री’ उत्कृष्ट करवून घेतली आणि आशीर्वाद दिला, ‘हा मुलगा उद्या मोठा अभिनेता होणार आहे.’

४. संगीतातील ‘सा’प्रमाणे नाटककार सावरकरांमधील ‘सा’चे महत्त्व ओळखायला हवे !

वर्ष १९४३ मध्ये सांगलीला झालेल्या अखिल महाराष्ट्र नाट्य संमेलनाच्या शताब्दी महोत्सवाच्या अध्यक्षपदाचा मान सावरकरांना मिळाला. त्यामुळे ‘झी मराठी’ या वाहिनीवर झालेल्या कार्यक्रमात नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करणे अगत्याचे होते; कारण तो एक इतिहास आहे. नाटकाच्या नांदीतील ‘सा’ला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच नाटककार सावरकरांमधील ‘सा’चे महत्त्व आपण ओळखले पाहिजे; म्हणून आम्ही म्हणतो ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ ?’

– श्री. विद्याधरपंत नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे.