इंदूर (तेलंगाणा) येथे झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’ला वारकरी, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

हिंदू एकता दिंडीत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

इंदूर (तेलंगाणा) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त येथे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. १९ मे या दिवशी काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये आर्य समाज, ओम शांती, भारतमाता भजनी मंडळ, विठ्ठलेश्वरी मंदिराच्या वारकरी संप्रदायाचे भक्त, सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासमवेत २५० हून अधिक लोक सहभागी झाले होते. दिंडीच्या प्रारंभी ध्वजाचे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिंडीच्या शेवटी नंदीपेट येथील श्री श्री श्री मंगी रामुलु महाराज आणि सनातनच्या सौ. विनुता शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दिंडीतील सहभागी महिलांचे पथक
दिंडीतील सहभागी बालपथक

वैशिष्ट्यपूर्ण

१. ‘आम्ही यापूर्वी अनेक दिंड्यांमध्ये सहभाग घेतला; परंतु आजच्या दिंडीमध्ये एक वेगळाच आनंद मिळाला. अशी दिंडी आम्ही प्रथमच पाहिली’, असे अनेक हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी सांगितले.

२. दिंडीच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवण्यासाठी ज्या चारचाकी वाहनाचा उपयोग केला होता, त्या गाडीच्या मालकांचा पुष्कळ भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘इतक्या चांगल्या कार्यासाठी माझ्या गाडीचा उपयोग झाला, हे माझे भाग्य आहे.’’

क्षणचित्रे

१. मुलांनी राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषा करून हिंदु संस्कृतीचा प्रचार केला. तसेच काही स्त्रिया स्वत:च्या डोक्यावर कलश घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

२. भजन मंडळातील महिलांनी भजन गातांना दांडिया खेळला. तसेच आर्य समाज संघटनेच्या युवकांनी लाठी, नानचाकू यांचे प्रात्यक्षिक सादर केले.

३. दिंडीच्या शेवटी २ मिनिटांसाठी थोडा पाऊस आला. या माध्यमातून या दिंडीला वरुणदेवतेचा आशीर्वाद मिळाला, असे वाटले.