‘हिंदू एकता दिंडी’ने अमरावती येथे चेतवले हिंदुत्वाचे स्फुलिंग !

पोलिसांकडून सनातन संस्थेच्या साधकांविषयी कौतुकोद्गार !

अमरावती, २४ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू एकता दिंडीमुळे शहरात वीरश्री निर्माण होऊन सर्वांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता.

दिंडीमध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, भजनी मंडळे, वारकरी, तसेच शिवकालीन मर्दानी पथक, तुळस आणि कलश घेतलेल्या महिलांचे पथक, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि श्री अंबादेवी, तसेच श्री एकवीरादेवी यांची प्रतिमा असलेली पालखी, रणरागिणी पथक, समाजप्रबोधनपर घोषवाक्य असलेल्या छत्रीचे पथक, प्रथमोपचार पथक इत्यादी विविध पथकांनी दिंडीची शोभा वाढवली. धर्माचरणाविषयी सांगणारे बालसाधकांचे पथक आणि राष्ट्रपुरुषांच्या पोषाखामधील बालसाधक हे दिंडीचे विशेष आकर्षण ठरले. चार ठिकाणी धर्मध्वज पूजन करून दिंडीचे स्वागत करण्यात आले. राजकमल चौक येथे पुष्पवृष्टी करण्यात आली. सांगता सभा घेऊन दिंडीचा समारोप करण्यात आला.

पराक्रमी पूर्वजांचा वारसा पुढे चालवायचा आहे ! – ह.भ.प. मदन महाराज तिरमारे, चांदूरबाजार

सर्व जण आपापल्या परीने हिंदु धर्मासाठी कार्य करतात; परंतु संघटित होऊन कार्य केल्यासच यश मिळते. त्यामुळे आपण आजपासून संघटित हिंदू म्हणून कार्य करू. आपले पूर्वज परम पराक्रमी आणि बुद्धीमान होते. त्यांचे आपण वंशज आहोत. तो वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे त्यांचा पराक्रम आणि शौर्य यांची गाथा पुढे न्यायची आहे.

क्षणचित्रे

१. ‘अन्य शोभायांमध्ये आमची कुणी चौकशी करत नाही; पण सनातनचे साधक आमच्याशी आपुलकीने वागतात आणि आम्हाला मानसन्मान देतात’, असे दिंडीच्या बंदोबस्तासाठी उपस्थित असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांनी सांगितले.

२. दिंडीच्या मार्गात एक अपंग व्यक्ती ‘वॉकर’ (चालण्यास त्रास होत असल्याने आधार म्हणून वापरण्यात येणारी काठी) घेऊन बसली होती. दिंडीतील घोषणा ऐकून त्या व्यक्तीनेही उत्साहाने मोठ्या आवाजात घोषणा दिल्या. स्वतःजवळ केवळ ७ रुपये असतांनाही तिने ती सर्व रक्कम दिंडीच्या कार्यासाठी अर्पण केली.

३. अचलपूर तालुक्यातील एका धर्मप्रेमींना मोठ्या रकमेचे चारचाकीचे प्रवासी भाडे असतांनाही ते सोडून दिंडीला उपस्थित राहिले. त्यांनी दिंडीसाठी काही रक्कमही अर्पण केली.

वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. श्री. सुरेश चिकटे, विश्व हिंदु परिषद – तुमचे आयोजन कौशल्य उत्कृष्ट आहे. मी सदैव तुमच्या समवेत आहे.

२. सौ. सुरेखाताई लुंगारे, माजी झोन सभापती आणि नगरसेवक, भाजप – कार्यक्रमाचे आयोजन आणि शिस्त कौतुकास्पद होती.

३. श्री. चंद्रकुमारजी जाजोदिया, प्रतिष्ठित उद्योजक – हिंदू संघटनासाठीचे तुमचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

४. श्री. तुलसी साधवानी, श्री. प्रकाश सिरवानी, भारतीय सिंधु सभा – हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी खरे कार्य तुम्ही करत आहात. आम्ही सर्वजण तुमच्यासमवेत या कार्यात सहभागी होऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने तुम्ही या कार्यात निश्चित यशस्वी व्हाल !

५. ह.भ.प. सुधीर महाराज बोरोडे – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने तुम्ही करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. दिंडीचे आयोजन आणि शिस्त मला आवडली.