युक्रेनकडून पहिल्या युद्धगुन्हेगार रशियन सैनिकास जन्मठेप !

रशियन सैनिक वादिम शिशिमरिन्

कीव्ह (युक्रेन) – युक्रेनच्या शस्त्रहीन नागरिकाला ठार मारल्याच्या प्रकरणी रशियाच्या एका सैनिकास युक्रेनच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. रशियाने फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर पेटलेल्या युद्धातील शिक्षा झालेला तो पहिला युद्धगुन्हेगार आहे. रशियाकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

२१ वर्षीय वादिम शिशिमरिन् असे या रशियन सैनिकाचे नाव असून तो रणगाडा कमांडर आहे. त्याला ६२ वर्षीय ओलेक्सांद्र शेलिपोव्ह यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. ईशान्य युक्रेनमधील चुपाखिव्का गावात २८ फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली होती. रशियाच्या आक्रमणानंतर रशियन युद्ध गुन्हेगारावर हा पहिला खटला आहे. रशियाने अनुमाने १० सहस्रांहून अधिक युद्धगुन्हे केल्याचे युक्रेनने नमूद केले आहे.