श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील चैतन्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ झोपलेल्या असतांना त्यांच्या शरिरातून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म ज्योतीचे दर्शन होणे

२३.३.२०२२ या दिवशी आम्ही महर्षींच्या आज्ञेने सिक्कीम राज्यातील गंगटोक शहरामध्ये होतो. तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी पहाटे उठून नामजप केला आणि सकाळी ६ वाजता त्या पुन्हा झोपल्या. त्या वेळी त्या अर्धवट झोपेत होत्या. मी सकाळी उठल्यानंतर प्रार्थना केली आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे पाहिल्यावर मला त्यांच्या शरिरातून एक ज्योत बाहेर पडतांना दिसली. ती ज्योत त्यांच्या शरिरातून बाहेर पडून कुठेतरी जात होती. त्या ज्योतीचे दर्शन मला साधारण २ ते ३ सेकंद झाले. ती ज्योत २ इंच उंचीची होती. त्या दिव्य ज्योतीकडे पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) तुमच्या कृपेमुळे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील दिव्य शक्तीचे मला दर्शन झाले.

श्री. वाल्मिक भुकन

२. ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ झोपलेल्या दिसल्या, तरी त्यांचे सूक्ष्मातून कार्य चालू असते’, असे महर्षींनी सांगणे आणि ‘संत ईश्वराप्रमाणे २४ घंटे कार्यरत असतात’, हे देवाने या अनुभूतीतून शिकवणे

महर्षींनी सांगितले होते, ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ झोपलेल्या दिसल्या, तरी त्यांचे कार्य सूक्ष्मातून चालू असते. त्यांचा सूक्ष्मदेह जेथे आवश्यकता आहे, तेथे जाऊन कार्य करून येतो.’ त्यांच्या शरिरातून बाहेर पडणारी सूक्ष्म ज्योत असेच कार्य करायला गेली होती. ‘ईश्वर २४ घंटे कार्यरत असतो, तसे संतही चोवीस घंटे कार्यरत असतात’, हे देवाने मला या अनुभूतीतून शिकवले.

३. ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची ओटी भरतांना पुष्कळ चैतन्य निर्माण होणे आणि ते सहन न झाल्याने ओटी भरणारी महिला अन् तेथील दोन पुरुष पळून जाणे’, असे साधकाला स्वप्नात दिसणे

२४.३.२०२२ या दिवशी मला स्वप्नात पुढील दृश्य दिसले – ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि मी एका घरी गेलो होतो. त्या घरातील एक महिला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची ओटी भरत आहे. ओटी भरतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ या मांडी घालून पदर पुढे करून ध्यानाच्या मुद्रेत बसल्या होत्या. ती महिला ओटी भरायला लागल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याभोवती गोल आकारात प्रकाश निर्माण झाला आणि तो पुष्कळ वाढला. त्यानंतर तेथील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली. ओटी भरणाऱ्या त्या स्त्रीला ते चैतन्य सहन झाले नाही. त्यामुळे ती ओटी न भरताच तिथून पळून गेली. त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर दोन पुरुष होते. तेसुद्धा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे हे रूप पाहून घाबरून पळून गेले. त्या वेळी ‘त्यांनाही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील चैतन्य सहन झाले नसेल’, असे मला वाटले.

४. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याभोवती प्रकाशाचे वलय बरेच वाढणे, त्या वेळी साधकाच्या मनाची अवस्था निर्विचार होणे आणि त्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे

मी स्वप्नातील दृश्यामध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याभोवती प्रकाशाचे वलय वाढल्याचे पाहिल्यावर माझ्या मनाची अवस्था निर्विचार झाली. मी त्या रूपाचे दर्शन घेत होतो. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या संपूर्ण देहाभोवती प्रकाश होता. नंतर तो प्रकाश पुष्कळ वाढून त्या आणि प्रकाश एकच झाल्या. या संपूर्ण प्रक्रियेचे दर्शन देवाने मला दिले. शेवटी मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘प.पू. गुरुदेव, भगवान श्रीकृष्णाने युद्धाच्या ठिकाणी एका भक्तासाठी स्वतःचे विश्वरूप दाखवले. ज्यांची भगवान श्रीकृष्णावर श्रद्धा आणि भक्ती होती, अशा भक्तांनाच भगवंताच्या रूपाचे दर्शन झाले. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे ते दिव्य रूप पहाण्याची माझी क्षमता नाही; पण श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याच कृपेमुळे मी हे रूप पाहू शकलो. हे दिव्य रूप माझ्या सतत स्मरणात राहो.’

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची सेवा माझ्याकडून त्या भावाने करवून घ्या’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना !

– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई, तमिळनाडू. १२.३.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक