मराठवाडा येथे १२ कोटींहून अधिक रुपयांची वीजचोरी उघड; ४ कोटी ६१ लाख रुपयांचा दंड वसूल !

जालना – महावितरण संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत गेल्या वर्षभरात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत संशयित वीजमीटरच्या पडताळणीत धाडी टाकून वीजचोर्‍या पकडण्यात आल्या. या वीजचोरी प्रकरणी ९ सहस्र २२० ग्राहकांवर १२ कोटी ८५ लाख ५१ सहस्र रुपयांच्या अनुमानित वीजदेयक दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात आली, तर ४ कोटी ६१ लाख १६ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत महावितरण कर्मचारी, भरारी पथक, दक्षता आणि सुरक्षा कार्यवाही विभाग यांच्या वतीने वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबवून वीजचोर्‍या पकडण्यात आल्या. संभाजीनगर परिमंडलात ३ सहस्र ६८२ ग्राहकांवर वीजचोरी प्रकरणी ४ कोटी ८४ लाख १५ सहस्र रुपये दंडाच्या अनुमानित देयकाची आकारणी करण्यात आली. यामध्ये ६९५ ग्राहकांकडून १ कोटी ६१ लाख ६८ सहस्र रुपये देयकाची वसुली करण्यात आली, तर ५६ वीजचोरांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. वीजचोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू रहाणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

समाजाची नैतिकता अधोगतीला जात असल्याचे उदाहरण ! कोट्यवधी रुपयांची वीजचोरी होत असतांना महावितरण आस्थापन झोपा काढत होते का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? वीज चोरी करणार्‍यांवर दंड वसूल करण्यासमवेत कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.