भक्तांचा उद्धार आणि धर्मसंस्थापना यांसाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती करणारे अन् भगवंताचे सगुण रूप असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

ब्रह्मांडनायकाचे सगुण रूप असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक प्रेम हे आम्हा साधकजिवांचे इहलोकीचे आणि परलोकीचे वैभव आहे. या दृष्टीने साधकांसाठी सर्वस्व असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी कृतज्ञतापुष्प रूपाने सौ. शालिनी मराठे यांनी लिहिलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना या लेखाचा दुसरा भाग आपण २० मे या दिवशी पाहिला. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा  : https://sanatanprabhat.org/marathi/581291.html


६. गुरुकृपायोगाची अन्य वैशिष्ट्ये !

६ अ. वैज्ञानिक परिभाषेत ज्ञान सांगितले जाणे : आधुनिक जगाला समजेल, अशा ‘वैज्ञानिक परिभाषेत केलेली ज्ञानाची मांडणी’, या गुरुकृपायोगाच्या अनन्यसाधारण वैशिष्ट्यामुळे आजचे विज्ञानवादी तरुणही गुरुकृपायोग अन् त्यातील अध्यात्मशास्त्र यांकडे आकर्षित होत आहेत.

६ अ १. अभ्यासवर्ग आणि शंकानिरसन : जिज्ञासूंसाठी असलेला अभ्यासवर्ग झाला की, लगेच त्यांच्या शंकाचे निरसन केले जाते. विज्ञानात बुद्धीची वाढ भरमसाट असते आणि तिला प्रश्नही असंख्य असतात. हे हुशारीचे लक्षण असते. अध्यात्मात आज्ञापालन आणि शब्दप्रमाण (गुरुवचन) अत्यंत महत्त्वाचे आहे; पण विज्ञानात ते गौण मानले जाते. हे ज्ञात असल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक वेळी शंकानिरसनाला प्राधान्य दिले. बुद्धीला सतत शंका येतात; पण जो बुद्धीत अडकला, तो आत्मतत्त्वापर्यंत कसा जाणार ? परात्पर गुरु डॉक्टर जिज्ञासूचे शंकानिरसन करून त्या जिवाला साधना करायला प्रवृत्त करतात. ते जिवाला अनुभूती देऊन त्याची बुद्धीच्या अडथळ्यांतून सुटका करतात.

६ अ २. ज्ञान टक्केवारीच्या भाषेत सांगितल्यामुळे जिज्ञासूला ते पटकन् आकलन होणे : ‘कर्मयोगापेक्षा भक्तीयोगाने अहं-निर्मूलन अधिक होते, तर गुरुकृपायोगाने पूर्णच अहं-निर्मूलन होते’, हीच गोष्ट ‘कर्मयोगाने २० टक्के, भक्तीयोगाने ५० टक्के, तर गुरुकृपायोगाने १०० टक्के अहं-निर्मूलन होते’, असे सांगितल्यावर जिज्ञासूंना ते सहज कळते.

६ अ ३. सारणी आणि तौलनिक अभ्यास : गुरुकृपायोगात विविध योगमार्गांचा तौलनिक अभ्यास आणि शक्य तिथे सारणी अन् टक्केवारी यांचा उपयोग केल्यामुळे आजच्या पिढीला ते आवडते आणि समजतेही.

६ अ ४. ‘सनातन धर्मातील तत्त्वे श्रेष्ठ आणि सिद्ध आहेत’, हे दर्शवणारे आध्यात्मिक संशोधन : सनातन धर्मातील तत्त्वे सिद्धच असतात, तरीही अज्ञानी जिवांची समजूत पटण्यासाठी त्यावर संशोधन करून ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (U.A.S)’, या उपकरणाद्वारे सिद्धांत सिद्ध करणे भाग पडते. ‘अरे, तुला ताप आला आहे’, असे सांगून मुलगा ऐकत नसेल, तर वडील तापमापकाने ताप मोजून मुलाला दाखवतात आणि खेळायला जायला प्रतिबंध करतात. समाजासाठीही तसेच करावे लागते. वैज्ञानिक उपकरणांचा खुबीने वापर करून बुद्धीचा अडथळा दूर करण्यात गुरुकृपायोग यशस्वी झाला आहे आणि होणारच आहे; कारण जेथे श्रीकृष्ण आहे, तेथे जयच जय आहे.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगाचा प्रसार करण्यासाठी निर्मिलेली प्रसारमाध्यमे

सौ. शालिनी मराठे

श्रीविष्णूने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) पृथ्वीवरील साडेसातशे कोटी माणसांच्या आत्मोद्धारासाठी गुरुकृपायोगाची निर्मिती केली आणि तो सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी (त्याच्या प्रसारासाठी) त्यांनी असंख्य साधनेही निर्माण केली. चोच निर्माण करणाराही तोच आणि दाणे निर्माण करणाराही तोच भगवंत आहे. गुरुकृपायोगानुसार साधना करून घेऊन भगवंताने मृतवत् झालेल्या हिंदु समाजाला जागृत केले. समाजाला साधनेची गोडी लावून हिंदूंचे ब्राह्मतेज वाढवले. परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारत्व सिद्ध करणारी, काही मोजकी प्रसारसाधने आपण येथे पहाणार आहोत.

७ अ. ‘सनातन प्रभात’ नियतकालिके : ‘सनातन प्रभात’ नियतकालिके, म्हणजे भगवान विष्णूने आपल्या भक्तांसाठी लिहिलेली पत्रेच आहेत. हृदयात ‘यदा यदा हि धर्मस्य..’, हा भगवान श्रीकृष्णाचा ब्रीद-श्लोक कोरून साधकांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश, समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती करणारा अन् जिज्ञासूंच्या आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करून सनातन धर्माची संस्थापना करणारा ‘सनातन प्रभात’हा धर्मसेवक आहे.

७ आ. पाचवा वेद असलेली सनातनची ग्रंथसंपदा : परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन धर्माविषयी काळानुसार आवश्यक असलेले आध्यात्मिक आणि जीवनावश्यक ज्ञान पुरवणारे ३५४ ग्रंथ संकलित केले असून विविध १७ भाषांत त्याच्या लक्षावधी (एप्रिल २०२२ पर्यंत ८८ लक्ष ८४ सहस्र) प्रती काढल्या आहेत. हे परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारी कार्य आहे. त्यांनी केलेल्या या परम कृपेसाठी अखिल मानवजातीचे त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक शतकोटी वंदन !

७ इ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय हे सनातन धर्माच्या सर्व अंगांचा तौलनिक अभ्यास करून संशोधन करणारे अद्वितीय विश्वविद्यालय आहे. हिंदु राष्ट्रात, म्हणजे कलियुगातील सत्ययुगात विश्वभरातील हिंदू आणि जिज्ञासू सर्व धर्मीय येथे सनातन धर्माचा अभ्यास करण्यासाठी येतील. येथे येऊन ते विविध योग आणि योगांगे, यज्ञसंस्कृती, १४ विद्या, ६४ कला यांचे शिक्षण घेतील. ‘गुरुकृपायोग’ हा सर्व योगांचा मुकुटमणी असेल. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य चालू झाले असून ऑक्टोबर २०१६ ते १५ मार्च २०२२ या कालावधीत राष्ट्रीय विज्ञान परिषदेत १६ शोधनिबंध, तर आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत ७३ शोधनिबंध, असे एकूण ८९ शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ९ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत सर्वाेत्कृष्ट ठरले !

७ ई. हिंदु जनजागृती समिती : धर्मनिरपेक्ष राजसत्तेने हिंदूंची झालेली परवड आणि अन्य पंथियांची आक्रमणे पहाता ‘आता धर्माधिष्ठित राज्याला, म्हणजे हिंदु राष्ट्राला पर्याय नाही’, हे सत्य हिंदूंनी ओळखले आहे. ‘ईश्वराच्या तारक रूपाच्या समवेतच हिंदूंनी आपले संघटन आणि क्षात्रतेज वाढवणे’, हा साधनेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’ कार्यरत झाल्यामुळे साधकांमधील क्षात्रतेज वाढून त्यांच्या साधनेला परिपूर्णत्व आले.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे धर्मसंस्थापनेचे हे कार्य अवतारी असून ते शब्दातीत असणे

परात्पर गुरु डॉक्टरांचे हे धर्मसंस्थापनेचे अवतारी कार्य ब्रह्मांडव्यापी, विश्वव्यापी, युगपरिवर्तन घडवणारे आणि सर्व जिवांचे कल्याण करणारे आहे. जेव्हा धर्माला अवकळा येते आणि अधर्म फोफावतो, तेव्हा ईश्वर अवतार धारण करतो. तो सज्जनांचे (साधकांचे) रक्षण करून दुर्जनांचा नाश करतो आणि धर्मसंस्थापना करून पुन्हा धर्मयुग (सत्ययुग) आणतो. ही सारी त्या श्री गुरुदेवांची कृपा, म्हणजे भक्तांवरील अपार प्रीतीच आहे; म्हणून ती अनिर्वाच्य (शब्दातीत) आहे.

त्या परम कृपाळू भगवंताच्याच सत्यसंकल्पाने पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना (धर्मसंस्थापना) होणार असून हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी महा, जन, तप या लोकांतून उच्च क्षमतेचे जीवही भगवंतच पृथ्वीवर पाठवत आहे. एक सहस्र वर्षे टिकणारे कलियुगातील सत्ययुग त्याच्या कृपेनेच अवतरणार आहे.

९. कृतज्ञता

‘देवा, तुझे अवतारी कार्य अनुभवण्याचे, युगपरिवर्तनाचे कार्य पहाण्याचे भाग्य आम्हा साधकांना तुझ्या असीम कृपेमुळे लाभत आहे. तुझ्या या कृपेसाठी अनंत अनंत कृतज्ञता !

हे लेखरूपी कृतज्ञतापुष्प तुझेच आहे, ते तुलाच अर्पण करते.’

– गुरुचरणी शरणागत,

सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२४.३.२०२१)

(समाप्त)