वंगभंग आणि विदेशी बहिष्कार आंदोलन यांमध्ये सहभाग घेणारे बिपीनचंद्र पाल  !

आज २० मे २०२२ या दिवशी देशभक्त बिपीनचंद्र पाल यांचा स्मृतीदिन

बिपीनचंद्र पाल यांचा प्रारंभीचा काळ

बंगालमधील सिल्हट गावी बिपीनचंद्र पाल यांचा जन्म झाला. मॅट्रिक झाल्यावर बिपीनचंद्र कोलकाता येथे शिक्षणास गेले. तेथे त्यांना केशवचंद्र सेन यांचा सहवास घडून त्यांनी ब्राह्म समाजाचा स्वीकार केला. त्यांच्या वडिलांना आपल्या चिरंजिवांनी केलेले हे ‘अब्रह्मण्य’ आवडले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मालमत्तेपैकी एक पैही बिपीनचंद्रांना न मिळण्याची व्यवस्था केली होती; पण शेवटी त्यांचे मन पालटले. पहिली पत्नी निवर्तल्यावर बिपीनचंद्र यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या विधवा पुतणीशी लग्न करून स्वतःचे नाव कर्त्या सुधारकामध्ये भरती केले. विद्यार्जन झाल्यावर कटकच्या शाळेत ते ३ वर्षे मुख्याध्यापक होते. त्यानंतर ५-६ वर्षे आपल्याच सिल्हट गावी त्यांनी एक विद्यालय चालवले. पुढे बेंगळुरूच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि कोलकात्याच्या ग्रंथालयाचे व्यवस्थापक अशीही त्यांनी कामे केली.

बिपीनचंद्र यांनी केलेले कार्य आणि त्यांना झालेल्या शिक्षा

यानंतर बिपीनचंद्र यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांचे पहिले सुप्रसिद्ध भाषण मद्रास येथील राष्ट्रसभेत हत्यारांच्या कायद्यावर झाले. त्यांच्या आवेशयुक्त आणि क्षोभकारक वक्तृत्वकलेची सर्वत्र प्रशंसा होऊ लागली. वर्ष १९०० मध्ये ते तत्त्वज्ञानाच्या तौलनिक अभ्यासासाठी इंग्लंडला गेले. तेथे ते ‘स्वराज्य’ नावाचे मासिक चालवत. भारतात त्यांचे ‘न्यू इंडिया’ नावाचे साप्ताहिक होते आणि अरविंदबाबूंच्या ‘वन्दे मातरम्’शी ही त्यांचा निकटचा संबंध होता. वर्ष १९११ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना पुन्हा शिक्षा झाली. त्यानंतर ते होमरूलच्या चळवळीत सामील होऊन शिष्टमंडळासमवेत विदेशातही गेले. त्यांच्या आयुष्यातील मध्यान्हकाल म्हणजे लाल, पाल, बाल या त्रयीने वंगभंग आणि विदेशी बहिष्काराच्या प्रचंड आंदोलनाच्या वेळी केलेल्या अद्वितीय कामगिरीचा होय. ‘पहाडी आवाजाचे दणदणीत वक्ते’, अशी त्यांची कीर्ती या काळात सर्व भारतात झाली होती. बिपीनचंद्र यांचा ‘इंडियन नॅशनॅलिझम’ (Indian Nationalism) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.’

(साभार : ‘दिनविशेष’)