गोव्याच्या संस्कृतीची पोर्तुगिजांनी केलेली हानी

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी एक डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. १९ मे या दिवशी आपण ‘पोर्तुगीज भाषा न येणाऱ्यांशी कठोरतेने वागणे’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.

२५. पोर्तुगिजांनी आणलेल्या संस्कृतीहीनतेवर उपाय

‘पोर्तुगिजांनी कितीही निर्दयतेने आमची पारंपरिक संस्कृती नष्ट केली, तरी नामोल्लेख करण्याजोगी नवी पर्यायी संस्कृती ते आम्हाला देऊ शकले नाहीत. आमच्या सखोल जीवनात किंवा भूमीत कोणतेही मूळ नसलेले असे एक संस्कृतीचे केवळ हास्यास्पद रूपांतर मात्र त्यांनी आम्हाला आंदण (भेट) दिले. आमच्या भूमीला किंवा वातावरणाला न मानवणारी बनावट संस्कृती आमच्यावर लादून त्यांनी आमच्या सहजप्रवृत्त प्रगतीला मात्र बाधा आणली. रानटी पद्धतीने घुसडवण्याचा परिणाम म्हणजे आम्हाला संस्कृतीहीन स्थितीत आणून सोडले. यातून सुटका करून घेण्याचा एकच उपाय म्हणजे आपण परत हिंदी परंपरेकडे जायला हवे.’ – (पृष्ठ क्र. ४८)

डॉ. टी.बी. कुन्हा

२६. पोर्तुगिजांनी केलेली कलेची हानी

‘आपल्या देशात ती आता अस्तित्वात नाही, असेही म्हटले जाईल. मूर्तीपूजेच्या नावाखाली आमच्या स्थानिक कलाकारांचा, लाकूड, माती, दगड यांपासून किंवा हस्तीदंती मूर्ती बनवणाऱ्यांचा, सुवर्णकारांचा छळ केल्यावर जे काही शेष राहिले आहे, त्यात आमची अवनति आणि अधोगतीच सिद्ध होते. आपल्या गत वैभवाची निशाणी म्हणून पोर्तुगिजांनी जे काही ठेवले आहे, ते थोरल्या गोव्यामध्ये उभारलेली पाश्चात्त्य कलेतील धार्मिक स्मारके. ही गोवेकर कलाकारांनीच निर्माण केली; पण त्या कलेविषयी त्यांना मुळीच ज्ञान नव्हते किंवा असल्यासही ते फार अस्पष्ट होते. त्यामुळे त्यातल्या सौंदर्याची त्यांना जाण नव्हती. चर्च वा कॉन्व्हेंटमधले युरोपियन ‘रेनेसांस’चे बेढब अंधानुकरण पाहिल्यास तिथे भडक मुलामा देऊन ‘आल्टर’ सुशोभित करतांना, अडाणी रुचीने वेगवेगळ्या शैलींचे धक्कादायक मिश्रण केलेले आढळते. चित्रकलेच्या विषयामध्ये आमच्याकडे सरकारी कौन्सिल हॉलमध्ये लावलेली व्हाईसरॉयची चित्रे होती. क्रमवारीने प्रदर्शित केलेली ही भव्य बुजगावणी आमच्या कौन्सिलरना घाबरवण्यासाठीच असावीत.’ – (पृष्ठ क्र. ४९-५०)

(लेखातील दिलेले पृष्ठ क्रमांक ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ या पुस्तकातील आहेत. इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)