अवेळी पडणारा पाऊस आणि तापमानात होणारी वाढ यांमुळे पिके, पशू, तसेच अन्य यांवर होणारा संभाव्य परिणाम अन् त्यावर करावयाची उपाययोजना !

अवेळी आलेला पाऊस आणि तापमानात होणारी वाढ यांमुळे पिके, फळे, पशू, शेतमजूर, तसेच अन्य यांवर काही ना काही परिणाम होत असतो. या परिणामामुळे शेतमालासह विविध फळांची मोठ्या प्रमाणात हानी होत असते. यामुळे शेतकऱ्यांची वा फळे आणि इतर पिकांची लागवड करणाऱ्यांची आर्थिक हानीही होत असते. ती टाळण्यासाठी नेमकी कशा प्रकारची उपाययोजना करायला हवी, याविषयीचा ऊहापोह येथे देत आहोत. जेणेकरून लागवड करणारे आणि शेतकरी यांची हानी न्यून होईल.

डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण

टीप १ : अ. आंब्याची काढणी सकाळच्या वेळेत ऊन नसतांना झेल्याच्या साहाय्याने १ ते १.५ इंच देठासह १४ आणे पक्वतेला (८० ते ८५ टक्के सिद्ध झालेले आंबे) लवकरात लवकर करून घ्यावी.

आ. आंब्याची घनता १.१ झाल्यास ‘आंबे काढण्यासाठी सिद्ध आहेत’, असे समजावे (४ – ५ आंबे काढून बालदीत पाणी घेऊन त्यात घालावेत. आंबे बुडल्यास घनता १.१ पेक्षा अधिक आहे, असे समजावे. आंबे पाण्यावर तरंगत असल्यास ‘ते अपक्व आहेत’, असे समजावे.) किंवा आंब्याला पाड लावून खाली पडल्यास ‘आंबे काढायला सिद्ध आहेत’, असे समजावे. आंब्याला एकाच वेळी मोहोर येत नसल्यामुळे आंबे तयार होतील, तसे काढून घ्यावेत.

टीप २ : आंब्यातील साक्याचे प्रमाण (हापूस आंबा) कमी करण्यासाठी शक्यतो काढणी सकाळी ऊन नसतांना करावी. काढलेली फळे शक्यतो सावलीत साठवावीत किंवा त्वरित पिकण्यासाठी आडीत टाकावीत. (आडी घालण्यापूर्वी आंब्याची प्रतवारी करून घ्यावी. तसेच देठ तुटलेल्या आंब्याची आडी वेगळी घालावी; कारण त्यातील काही आंबे पिकतांना देठाजवळ खराब होण्याची शक्यता असते.)

टीप ३ : आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विद्यापिठाने शिफारस केलेले फळमाशीरक्षक सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात बागेत झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यांवर लावावेत.

टीप ४ : आंबे बाविस्टीन पावडरच्या ०.२ टक्के द्रावणात (म्हणजे १ लिटर पाण्यात २ ग्रॅम बाविस्टीन पावडर घातलेल्या द्रावणात) बुडवून लगेच काढून घ्यावेत किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फाईट ०.०५ टक्के (०.५ ग्रॅम प्रति लिटर) कोमट पाण्यात (५० अंश सेल्सियस) घालून १० मिनिटे बुडवून काढावेत आणि पाणी सुकण्यासाठी गवतावर किंवा सुती कापडावर अथवा कागदावर ठेवावेत. आंबे सुकल्यानंतर आंबे पिकण्यासाठी आडीत घालावेत.

(क्रमश: उद्याच्या दैनिकात)

– संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), एम्.एस्सी. (ॲग्रीकल्चर) पीएच्. डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१७.५.२०२२)