कुतूबमिनार नव्हे, सूर्यस्तंभ !

कुतुबमिनार हा राजा विक्रमादित्य याने बांधलेला ‘सूर्यस्तंभ’ !

ताजमहाल आणि ज्ञानवापी मशीद यांच्यानंतर आता कुतूबमिनार ही हिंदूंची वास्तू असल्याची भूमिका जोरकसपणे मांडली जात आहे. हिंदूंनी ही भूमिका फार  पूर्वीपासून घेतली होती; मात्र पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी धर्मवीर शर्मा यांनीच ‘कुतूबमिनारची उभारणी राजा विक्रमादित्य याने केली होती’, असे सांगितल्यानंतर हिंदूंच्या या भूमिकेला बळ मिळाले आहे. ‘देशाची राजधानी असलेल्या देहली येथील कुतूबमिनार हा सूर्यस्तंभ आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे. धर्मवीर शर्मा हे भारतातील प्रतिष्ठित पुरातत्वशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. त्यांनी कुतूबमिनारच्या (सूर्यस्तंभाच्या) संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  या संदर्भातील अनेक पुरावे त्यांच्याकडे असून त्यांनी अनेक वेळा पुरातत्व विभागाच्या अंतर्गत या वास्तूचे सर्वेक्षण केले आहे. कुतूबमिनार ही स्वतंत्र इमारत असून तिच्या जवळ असलेल्या मशिदीशी याचा काहीही संबंध नाही. कुतूबमिनार ही एक वेधशाळा असून ती नक्षत्रांची मोजणी करण्यासाठी वापरली जात होती. या मिनारच्या तिसऱ्या मजल्यावर सूर्यस्तंभ आहे. शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी ‘कुतूबमिनार’च्या आतमध्ये देवनागरी लिखाण पाहिले आहे. शर्मा यांनी असेही म्हटले आहे की, याची उभारणी कुतुबुद्दीन ऐबक याने नाही, तर राजा विक्रमादित्य याने खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिर यांच्या नेतृत्वाखाली साधारणत: १ सहस्र ७०० वर्षांपूर्वी केली होती. हा सूर्यस्तंभ २५ इंच तिरका आहे; कारण या ठिकाणाहून सूर्याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे या स्तंभाची सावली २१ जून या दिवशी दुपारी १२ वाजता भूमीवर पडत नाही. या वेधशाळेत अनेक अशा कलाकृती आहेत, ज्या केवळ हिंदु धर्मातच आढळून येतात. याचा उपयोग ‘अजान’ देण्यासाठी होऊ शकत नाही; कारण यातील आवाज बाहेर जाऊ शकत नाही. याच्यावर ते बनवणाऱ्यांची नावे लिहिण्यात आली असून ज्यात एकही मुसलमान नाही. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार यातील एका खांबांची पहाणी करतांना खांबावर भगवान नृसिंह आणि भक्त प्रल्हाद यांची मूर्ती दिसून आली आहे. ही मूर्ती अत्यंत प्राचीन असून एकमेवाद्वितीय आहे. यापूर्वी पुरातत्व विभागाचे अधिकारी के.के. महंमद यांनीही सांगितले होते की, कुतूबमिनार परिसरातील मशीद बांधण्यासाठी २७ हून अधिक हिंदु-जैन मंदिरांना तोडण्यात आले. या तोडण्यात आलेल्या मंदिरांच्या दगडांपासूनच ‘कुव्वत उल इस्लाम मशीद’ बनवण्यात आली. कुतूबमिनारजवळ मंदिरांचे अवशेष मिळाले असून त्यात अनेक गणेशमूर्ती आहेत. त्यामुळे येथे पूर्वी अनेक मंदिरे होते, हे सिद्ध होते.

जनतेची दिशाभूल करणारा पुरातत्व विभाग !

‘कुतूबमिनार हा सूर्यस्तंभ आहे’, हे इतके दिवस पुरातत्व विभागाने का सांगितले नाही ? शर्मा हे इतके दिवस प्रत्यक्ष शासकीय सेवेत असतांना त्यांनी हिंदु समाजासमोर या गोष्टी का मांडल्या नाहीत ? त्यांना तसे करण्यापासून तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रतिबंध केला का ? या गोष्टींचाही ऊहापोह होऊन त्याची वस्तूस्थिती समोर आली पाहिजे. वास्तविक भारत हा देश हिंदूंची मंदिरे आणि संस्कृती यांसाठी ओळखला जातो. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर हिंदूंची मंदिरे आणि वास्तू यांवर अतिक्रमण करून इस्लामीकरण लादलेल्या वास्तूंची सत्यता जगासमोर आणणे हे पुरातत्व विभागाचे मुख्य काम असणे अपेक्षित होते. काँग्रेसच्या कार्यकाळातील पुरातत्व विभागाने उत्खनन, संशोधन असे काही न करता अनेक वास्तूंचे हिंदुत्व लपवून त्या मुसलमानांची असल्याची, त्यांनी बांधल्याची खोटी माहितीच समाजासमोर येणे सयुक्तिक मानले. इतकेच काय, तर तशा प्रकारची माहिती अधिकृतरित्या शासकीय संकेतस्थळे, तेथील वास्तूंसमोरील पाट्यांवर लावण्यात आली. यामुळे देशभरातील अशा वास्तू जे जे पहायला येतात, त्यांच्यापर्यंत खोटी माहितीच गेली, तसेच परदेशी पर्यटकांसमोरही हिंदूंचा सत्य इतिहास समोर न येता, मोगलांचा-आक्रमकांचा इतिहास म्हणून जगासमोर गेला. हा प्रकार अत्यंत गंभीर असून अशा प्रकारे इतिहासाशी प्रतारणा केल्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे. देश ‘स्वच्छ’ होण्याचा ध्यास घेतलेले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आता पुरातत्व विभागही स्वच्छ करण्यासाठी हा विभाग विसर्जित करून तेथे धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, खऱ्या इतिहासतज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. असे झाल्यास भारताचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर येण्यास वेळ लागणार नाही आणि हिंदु राष्ट्राच्या दिशेने टाकलेले ते एक पाऊलच असेल !

हिंदूंचा दैदिप्यमान इतिहास समोर येऊ न देणारा पुरातत्व विभाग आता विसर्जित करा !