ज्ञानवापी परिसरात सापडलेले अवशेष मंदिरांचेच असण्याची शक्यता ! – अजय कुमार मिश्रा

  • ज्ञानवापी परिसरात सापडले देवतांच्या खंडित मूर्तींचे अवशेष

  • माजी न्यायालय आयुक्त अजय कुमार मिश्रा यांच्याकडून सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयाला सादर

माजी न्यायालय आयुक्त अजय कुमार मिश्रा (डावीकडे)

वाराणसी (उत्तरप्रदेश)- येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने ज्ञानवापी मशिदीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा आणि चित्रीकरणाचा अहवाल न्यायालय आयुक्त विशाल  सिंह यांनी सादर केला आहे. तसेच त्यापूर्वी न्यायालयाकडून हटवण्यात आलेले न्यायालय आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनीही त्यांचा २ पानी अहवाल सादर केला. या अहवालामध्ये ज्ञानवापी मशीद आणि परिसरात देवतांच्या खंडित मूर्तींचे अवशेष, मंदिराचा ढिगारा, शेषनागाची कलाकृती, कमळाच्या आकृत्या, शिलापट्ट्या आढळून आल्या आहेत, असे सांगिण्यात आले आहे. अजय मिश्रा म्हणाले, ‘मी जे काही तेथे पाहिले, ते पहाता ते बांधकाम एका मंदिराचे असल्याचेच लक्षात येते. चित्रीकरणाशी संबंधित ‘चिप’  राज्याच्या तिजोरीच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे.’ अजय कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ६ आणि ७ मे या दिवशी सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर १४ ते १६ मे या कालावधीत ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. १४ ते १६ काळातील सर्वेक्षणाचा न्यायालयाला सादर केलेला अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

अजय कुमार मिश्रा याच्या अहवालात सांगण्यात आलेली माहिती

१. मशिदीच्या बाहेर उत्तर ते पश्‍चिम भिंतीच्या कोपर्‍यात जुन्या मंदिरांचे अवशेष आहेत, ज्यावर देवतांच्या कलाकृती आहेत.

२. दगडी पाटावर कमळाचा आकार दिसत होता. दगडांच्या आतील बाजूस असलेल्या काही कलाकृतींमध्ये स्पष्टपणे कमळ आणि इतर आकृत्या होत्या.

३. उत्तर-पश्‍चिम कोपर्‍यावर नवीन बांधकाम वाळूच्या सिमेंटने केले आहे. उत्तरेकडून पश्‍चिमेकडे चालतांना शेषनागाची कलाकृती मध्यवर्ती खडकावर सापाच्या फणाप्रमाणे आढळून आली.

४. मूर्तीसारखी दिसणारी चौथी आकृती शेंदरी रंगाच्या जाड थराने झाकलेली आहे.

५. भूमीवर सापडलेल्या दगडी पाट्या खूप दिवसांपासून पडल्यासारखे वाटत होते. त्या एका मोठ्या इमारतीच्या तुकड्यांचा भाग असल्याचे दिसून आले.

६. मशिदीच्या बाहेर दरवाजाच्या चौकटी सापडल्या. या चौकटी म्हणजे शृंगारगौरी मंदिराच्या चौकटीचे अवशेष असल्याचे हिंदु पक्षकारांकडून सांगण्यात आले.

छायाचित्रकाराने फसवणूक केली ! – अधिवक्ता अजय कुमार मिश्रा

अजय कुमार मिश्रा यांना न्यायालयाने ‘न्यायालय आयुक्त’ पदावरून हटवल्याविषयी अधिवक्ता मिश्रा म्हणाले की, मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी छायचित्रकाराला चित्रीकरणाचे काम दिले, त्याने फसवणूक केली. विशाल सिंह यांच्या तक्रारीवरून मला हटवण्यात आले आहे. अधिवक्ता विशाल सिंह यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी माझीही फसवणूक केली. माझ्या विश्‍वासू स्वभावाचा अपलाभ घेतला. विशाल सिंह माझ्याविरुद्ध कट रचत आहेत, हे मला ठाऊक नव्हते. विशाल सिंह यांनी त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मला निराश केले, याचे मला खरोखरच दु:ख आहे. मी सर्वेक्षणाच्या संचालनावर समाधानी आहे. न्यायालयाला जे योग्य वाटले ते केले. सर्वेक्षणाविषयी मी काहीही बोलणार नाही.

विशाल सिंह यांच्या अहवालातील काही ठळक सूत्रे

१. वजू खान्याच्या (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) येथील पाणी उपसल्यानंतर तेथे एक गोल अडीच फुटांचा दगड आढळून आला. याचे व्यास अनुमाने ४ फूट इतके होते. त्याच्या टोकावर छिद्र होते आणि त्यात सळी घातली असता ती ६३ सें.मी. खोल गेली. येथे कारंजासाठी पाईप लावण्यासाठीची कोणतीही जागा आढळून आली नाही. याचे चित्रीकरण करण्यात आले. हिंदु पक्ष याला ‘शिवलिंग’ म्हणत आहेत, तर मुसलमान ‘कारंजे’ म्हणत आहेत.

२. याविषयी उपस्थित ‘अंजुमन इंतेजामिया कमिटी’चे मुंशी एजाज महंमद यांना विचारणा केली असता त्यांनी हे कारंजे प्रथम २० वर्षांपासून आणि नंतर गेल्या १२ वर्षापासून बंद आहे, असे सांगितले. त्यांना कारंजे चालू करून दाखवण्यास सांगितले असता त्यांनी असमर्थता दर्शवली. (मुळातच ते कारंजे नसल्याने ते चालू तरी कसे करून दाखवणार ? लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठीच याला कारंजे जाणीवपूर्वक म्हटले जात आहेत ! – संपादक)

३. या दगडाच्या वरच्या भागात सिमेंटचा थर नंतर लावण्यात आला असल्याचे आढळून आले.

४. मशिदीच्या उत्तर दिशेकडील घुमटाच्या ८ फूट खाली शंख दिसले.

५. एका कोपर्‍यात त्रिशूल, डमरू आणि स्वस्तिक आढळून आले, तसेच हत्तीची सोंडही दिसून आली.

६. ज्ञानवापी मशिदीच्या मागे एक भिंतीवर शिवलिंग आढळून आले.