१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या सोहळ्यानिमित्त सेवा मिळणे; पण ‘सेवा करण्यास अडचण येऊ शकते’, असा विचार येणे; मात्र गुरुदेवांना आत्मनिवेदन केल्यावर मन शांत होणे
‘२.५.२०२१ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ दाखवण्यात येणार होता. २९.४.२०२१ या दिवशी उत्तरदायी साधकांनी या सोहळ्यानिमित्त मला एक सेवा सांगितली. ही सेवा करण्यासाठी मला १ आणि २.५.२०२१ या २ दिवसांत साधकांना भ्रमणभाष करून त्यांचा आढावा घ्यावा लागणार होता. घरातील अडचणींमुळे ‘मला ही सेवा करणे कसे शक्य होईल ?’, असा एक प्रश्न माझ्या मनात येऊ लागला. तेव्हा गुरुदेवांनीच मला आत्मनिवेदन करायला सुचवले. मी मनातील सर्व विचार आणि अडचणी आत्मनिवेदन करून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केल्या. मी गुरुदेवांना ‘आपण मला दिलेली सेवा आपणच माझ्याकडून आपल्याला अपेक्षित अशी करवून घ्या’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर माझे मन पुष्कळ शांत आणि स्थिर झाले.
२. अकस्मात् डोळा लाल होणे आणि कुटुंबियांनी वेगळ्या खोलीत रहाण्यास सांगणे
२ अ. अकस्मात् डोळा लाल झाल्यावर कुटुंबियांनी अलगीकरणात वेगळ्या खोलीत रहाण्यास सांगितल्याने ‘सेवा करायला मिळेल’ या विचाराने कृतज्ञता व्यक्त होणे : ३०.४.२०२१ या दिवशी माझा उजवा डोळा काही कारण नसतांना लाल झाला. ‘डोळे लाल होणे’, हे कोरोना संसर्गाचे एक लक्षण मानले जाते’, हे माझ्या कुटुंबियांना समजले. तेव्हा ‘मला कोरोना संसर्ग झाला असू शकतो’, या विचाराने कुटुंबियांनी मला एका वेगळ्या खोलीत रहाण्यास सांगितले. त्यामुळे माझा आणि कुटुंबियांचा सहवास अल्प झाला. त्या वेळी माझ्या मनात ‘मला कोरोनाचा संसर्ग आहे कि नाही ?’, हा विचार न येता ‘मला सेवा करायला मिळत आहे अन् कृपाळू गुरुमाऊलींनीच ही सेवेची संधी दिली आहे’, या विचाराने माझी गुरुचरणी अपार कृतज्ञता व्यक्त होत होती.
२ आ. वेगळ्या खोलीत राहिल्याने निर्विघ्नपणे सेवा करता येणे आणि गुरुदेवांना सतत प्रार्थना होणे : १ आणि २.५.२०२१ या २ दिवसांत ‘भ्रमणभाषवरून साधकांचे आढावे घेणे, ‘प्रत्येक साधकाला प्रत्येक सूत्र स्पष्ट झाले आहे ना ?’, याची निश्चिती करणे’, अशा सेवा चालू होत्या. सेवा करतांना माझ्या मनात ‘प्रत्येक साधकाला सोहळा निर्विघ्नपणे पहाता आला पाहिजे’, असा एकच विचार होता आणि त्यासाठी माझी गुरुदेवांना सतत प्रार्थना होत होती. गुरुदेवांच्या कृपेने मी वेगळ्या खोलीत असल्याने मला सर्व सेवा करता आल्या.
३. ‘अकस्मात् डोळा लाल होणे आणि सोहळा झाल्यानंतर डोळा ठीक होणे’, हे देवाचे नियोजन असल्याचे लक्षात येणे
२.५.२०२१ या दिवशी गुरुदेवांचा जन्मोत्सव सोहळा त्यांच्याच कृपेने मला निर्विघ्नपणे अनुभवता आला. हा सोहळा झाल्यानंतर माझा डोळा बरा झाल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मला गुरुदेवांच्या अपार कृपेची अनुभूती आली. ‘अकस्मात् डोळा लाल होणे’, हे देवाचेच नियोजन होते. ‘मला सेवेची संधी मिळावी’, यासाठी देवानेच मला वेगळे ठेवून माझ्याकडून सेवा करून घेतल्याचे माझ्या लक्षात आले.
मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. संगम बोरकर, गोवा (११.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |