२.५.२०२१ या दिवशी श्री गुरूंचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) दिव्यदर्शन सोहळा पहातांना साक्षात् श्री नारायणाचे दर्शन घेतले आणि मी धन्य झालो. हा सोहळा पहातांना मला आलेल्या अनुभूती श्री गुरुचरणी समर्पित करत आहे.
१. सोहळ्याच्या स्थानी उभा केलेला सभामंडप बघून मला फार प्रसन्न वाटत होते. ‘सभामंडपाचे दालन ईश्वरी चैतन्याच्या अलंकारांनी सुशोभित झाले आहे’, असे मला वाटले.
२. श्री गुरूंचे सिंहासनस्थ सुंदर आणि दिव्य रूप पहातांना श्रीकृष्णाचे दर्शन होणे : श्री गुरुदेवांकडे पहातांना मला साक्षात् श्रीकृष्णाचे दर्शन झाले. गुरुदेवांचे सिंहासनस्थ भव्य-दिव्य देखणे रूप, तोंडवळ्यावरील तेज, शांतचित्त आणि निर्मोही रूप पाहून माझ्या मनाला समाधान वाटले.
३. सौ. अनघा जोशी आणि कु. तेजल पात्रीकर यांनी भावपूर्ण गायलेले भजन व्यावसायिक गायकांपेक्षा अधिक परिणामकारक वाटणे : सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी गायलेले भजन फार छान होते. त्यांच्या आवाजात गोडवा जाणवत होता. व्यावसायिक गायकांनी गायलेल्या भजनांपेक्षा ते भजन अनेक पटींनी परिणामकारक होते.
४. कु. प्रिशा सबरवाल हिचे नृत्य फारच सुंदर आणि भावपूर्ण होणे : कु. प्रिशा सभरवाल (आध्यात्मिक पातळी ५८ टक्के, वय १५ वर्षे) हिने फार छान आणि भावपूर्ण नृत्य सादर केले. तिच्या तोंडवळ्यावरचे भाव आणि नृत्यमुद्रा अतिशय सुंदर होत्या.
५. डोलोत्सवाच्या आरंभी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री गुरुचरणी पुष्पे अर्पण केली. त्याच्या काही क्षण आधी माझे हात आपोआपच नमस्काराच्या मुद्रेत जोडले गेले.
६. ‘श्री गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे शुद्ध दैवी ऊर्जेचे स्रोत आहेत’, असे जाणवणे : ‘श्री गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे शुद्ध दैवी ऊर्जेचे स्रोत आहेत’, असे मला जाणवत होते. उपस्थित संतांमुळे पुष्कळ चैतन्य जाणवत होते. तेव्हा ‘हिंदु राष्ट्र येणार’, असा आत्मविश्वास वाढला. ‘मी देवलोकच पहात आहे’, असे मला वाटत होतो.
७. श्री गुरूंचे रूप पाहून प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांच्या आरंभीच्या श्लोकाची आठवण होणे : सोहळा चालू असतांना श्री गुरूंचे रूप पाहून मला प.पू. भक्तराज महाराज त्यांच्या भजनांच्या आरंभी म्हणत असलेल्या श्लोकाची आठवण झाली आणि श्लोकाचा अर्थ खऱ्या अर्थाने मला समजला.
‘ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।।’
८. कृतज्ञता : ‘देवलोक कसा असतो ?’, याची मला फार उत्सुकता असायची. देवाने मला अद्वितीय असा सोहळा अनुभवायला दिला, त्याबद्दल त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. सारंग ओझरकर, न्यू जर्सी, अमेरिका. (१.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |