पुरुष मद्यप्राशन करण्यामध्ये गोवा देशात पहिल्या स्थानावर ! – राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण

गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ डॉ. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास लिहिला आहे. त्यात ‘गोमंतकियांना मद्यपी बनवण्यात पोर्तुगिजांचा कसा हात होता’, ते स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालावरून डॉ. टी.बी. कुन्हा यांचे द्रष्टेपण सिद्ध झाले.

पणजी, १७ मे (वार्ता.) – गोव्यात ५९ टक्के पुरुष मद्यप्राशन करतात, तर पुरुष मद्यप्राशन करण्यामध्ये गोवा राज्य देशात पहिल्या स्थानावर आहे, अशी माहिती वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण -५’मधून (‘एन्.एफ्.एच्.एस्.-५’मधून) उघड झाली आहे.

या सर्वेक्षणाच्या अहवालात पुढे म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेशमधील ५७ टक्के, तेलंगाणामधील ५० टक्के आणि लक्षद्वीपमध्ये १ टक्का पुरुष मद्यप्राशन करतात. गोव्यातील २१.३ टक्के महिलांना जीवनात शारीरिक किंवा लैंगिक हिंसेला सामोरे जावे लागते. १८ ते ४९ वर्षे वयोगटातील १० टक्के महिलांना जीवनात कौटुंबिक हिंसेला सामोरे जावे लागते. देशभरामध्ये गोव्यातील सर्वाधिक म्हणजेच ९१ टक्के महिला भ्रमणभाषचा वापर करतात. सिक्कीम राज्यातील ८९ टक्के महिला भ्रमणभाषचा वापर करतात.

डॉ. टी.बी. कुन्हा यांच्या‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातील उतारा

कॅथॉलिकांची देणगी- दारूचे व्यसन

‘आमच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास सिद्ध करणारे आणखी एक उदाहरण म्हणजे आमची मद्यपानातील भयानक प्रगती !

या शारीरिक आणि नैतिक अधःपतनात कॅथॉलिक लोकच अग्रणी आहेत. त्यांनी आपल्या उदाहरणाने हिंदूंनासुद्धा भ्रष्ट केले आहे. हिंदु किंवा मुसलमान धर्म या विषारी दुर्गुणाचा प्रसार करण्यावर निर्बंध घालीत, हे जगजाहीर आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये मद्यपानाला मज्जाव नसल्याचा लाभ आमच्या पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी घेतला आणि मुद्दाम दुष्ट वृत्तीने स्थानिक दारूचे बेसुमार उत्पादन आणि खप वाढवला. तसेच विदेशी मद्यालासुद्धा स्वतःला धनवान बनवण्यासाठी उत्तेजन दिले. खरेतर, ख्रिस्तीकरणाचे धोरण आणि मद्यपानाला फायदेशीर उत्तेजन ही दोन्ही हातात हात घालून पुढे जात होती. मद्यापायी मिळणारे उत्पन्न काही वर्षांपूर्वी देशाच्या सर्व उत्पन्नाच्या १/५ इतके झाले. त्याचबरोबर मद्य आणि दारूची आयात करायला पाठिंबा दिला गेला; कारण पोर्तुगिजांकडून मुख्यतः त्याचीच निर्यात होत असते. परिणामी धार्मिक समारंभ, प्रार्थना, बाप्टीझम्, लग्नकार्ये, इतकेच नव्हे, तर प्रेतयात्रा हे प्रसंग अनिर्बंध मद्यपानाचे प्रसंग बनले आहेत आणि या सगळ्याला कॅथॉलिक धर्माच्या सत्ताधिकार्‍यांची अलिखित संमती असते. या अघोरी धोरणामुळेच गोवा हा जगातल्या सर्वांत अधिक मद्यपी देशांपैकी एक बनला आहे आणि लंडनमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत तसा त्याचा उल्लेखही करण्यात आला. आपल्या वंशाचे शारीरिक अधःपतन आणि मानसिक उदासीनता याला तेच उत्तरदायी आहेत, गोवेकर ज्या ‘व्हिस्की आणि सोडा’ अन् ‘व्हाईट वाईन ऑफ मास’ छाप संस्कृतीत निपुण झाले आहेत, तिची एवढीच जमेची बाजू !’  – (पृष्ठ क्र. ५८)

(इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)

(गोवा मुक्तीच्या ६० वर्षांनंतरही या स्थितीत जराही पालट झालेला नाही ! – संपादक)