विज्ञापनांची अतिशयोक्ती !

अभिनेत्री साई पल्लवी या दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. साई पल्लवी यांना एका ‘फेअरनेस क्रीम’च्या विज्ञापनासाठी जवळपास २ कोटी रुपयांचे मानधन मिळणार होते. ‘लोकांना गोंधळात टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा प्रचार करत नाही’, असे सांगून त्यांनी कोट्यवधी रुपयांचे मानधन न घेता ते विज्ञापन नाकारले. अयोग्य विज्ञापने न करता प्रामाणिकपणा दाखवणारे कलाकारच देशाचे आदर्श नागरिक आहेत.

‘कोणत्याही चुकीच्या गोष्टींचा प्रसार करायचा नाही’, असे सांगत दाक्षिणात्य चित्रपटातील अनेक कलाकारांनी कोट्यवधी रुपयांच्या ‘ऑफर’ नाकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. लोकांच्या आरोग्यास हानीकारक असलेल्या तंबाखू, गुटखा अशा उत्पादनांची विज्ञापने करण्यासही त्यांनी नकार दिला आहे. याउलट हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी गुटख्याचे विज्ञापन केल्यामुळे महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (‘एफ.डी.ए.’ने ) अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी यांना नोटीस बजावली होती. याविषयी एफ.डी.ए.ने केलेले पुढील भाष्य अतिशय बोलके आणि विचार करण्यासारखे आहे. ‘महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी असूनही हे कलाकार पान मसाल्याचे विज्ञापन करतात. त्याद्वारे एक प्रकारे पान मसाला आणि गुटखा यांना प्रोत्साहनच देतात. यामुळे अनेक लोक गुटख्याकडे आकर्षित होऊन आरोग्य धोक्यात घालत आहेत. राज्यात गुटख्यावर बंदी असूनही वर्ष २०१५ मध्ये याचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.’

चित्रपटातील कलाकारांना तरुणवर्ग आदर्श मानत त्यांचे अनुकरण करतो. उत्पादनाविषयी विज्ञापनांमध्ये असणारी अतिशयोक्ती आणि कलाकारांचे योगदान यांमुळे विशेषतः तरुणवर्ग चुकीच्या दिशेने जात आहे. अयोग्य उत्पादने सिद्ध करणारे, त्यांची विज्ञापने करणारे कलाकार आणि त्यांच्यावर कठोर कारवाई न करणारे प्रशासन असे सर्वच जण शिक्षेस पात्र आहेत, असे खेदाने म्हणावे लागत आहे. हिंदु राष्ट्रात अशी स्थिती असणार नाही. यातून जनतेने कुणाचा आदर्श ठेवायचा ? याचा विचार करावा. अयोग्य विज्ञापन न करता कोट्यवधी रुपयांचे मानधन नाकारणाऱ्या अभिनेत्री साई पल्लवी यांचा आदर्श अन्य अभिनेते आणि अभिनेत्री घेतील का ?

– सौ. अपर्णा जगताप, पुणे