पंढरपूरच्या यात्रेसाठी २० लाख प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवून ‘एस्.टी.’चे नियोजन चालू ! – विलास राठोड, विभाग नियंत्रक

श्री. विलास राठोड

सोलापूर, १७ मे (वार्ता.) – गेली दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे पंढरपूर येथील आषाढी यात्रा झाली नाही. यंदा मात्र राज्य परिवहन महामंडळ आषाढी यात्रेसाठी जय्यत सिद्धता करत असून २० लाख प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवून नियोजन चालू केले आहे. गतवेळचा अनुभव पहाता किमान ५ सहस्र ६०० गाड्यांचे नियोजन आम्ही यात्रेसाठी करत आहोत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री. विलास राठोड यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी बोलतांना दिली.

१. वैष्णवांचा मेळा असलेली ही राज्यातील सर्वांतील सर्वात मोठी यात्रा असल्यान त्याचे व्यापक स्तरावर नियोजन चालू आहे. संपकाळातील बंद गाड्यांची दुरुस्ती, तसेच अन्य कामेही वेगाने करून सर्व बसगाड्या सध्या विविध मार्गांवर धावत आहेत. राज्यभरातून आणि परराज्यातूनही आषाढीसाठी एस्.टी. येतात. येणारे बसचालक आणि वाहक यांची रहाणे, भोजन यांची सोय मंडळाच्या वतीने करण्यात येते. त्याचेही नियोजन चालू आहे.

२. पंढरपूर शहर परिसरात विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या बसेससाठी किमान ५ अस्थायी स्थानके सिद्ध करण्यासाठीचे नियोजन चालू आहे. अस्थायी बसस्थानकांसाठी भूमी पहाणे, तेथील स्वच्छता, फलाट उभारणी यांचीही सिद्धता चालू आहे.

३. उन्हाळी हंगामात पुणे येथे जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकातून प्रत्येकी १५ मिनिटांला शिवशाही, निमआराम, आराम, तसेच साधी बसगाडी उपलब्ध आहे. उन्हाळी हंगामात आमचे उत्पन्न योग्य नियोजन आणि वाढत्या प्रवाशांची संख्या यांमुळे ४५ लाखांवरून ९५ लाख रुपये झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी मिळणार १० इलेक्ट्रिक बसगाड्या !

सोलापूर जिल्ह्यासाठी लवकरच १० इलेक्ट्रिक बसगाड्या मिळणार असून त्यासाठी सोलापूर आगारात ‘चार्जिंग स्टेशन’ उभारण्याची प्रक्रिया गतीने चालू आहे. सोलापूर-पुणे, सोलापूर-विजापूर या मार्गावर गाड्या चालवण्यात येणार आहेत.