शोभायात्रांवरील आक्रमणात ‘सेक्युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) केले जाते जिहाद्यांचे रक्षण !

१. हिंदूंवर आक्रमणाच्या वेळी शांत असणारे धर्मनिरपेक्षतावादी धर्मांधांवरील कारवाईच्या वेळी जागे होणे

श्रीरामनवमी उत्सव आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने देशभर शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रांवर राजस्थान, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, झारखंड, आणि देहली येथील जहांगीरपुरीमध्ये जिहाद्यांनी सुनियोजितपणे आक्रमणे केली. त्यांनी धर्मप्रेमी हिंदूंवर दगड, बाटल्या, एवढेच नाही, तर बंदुकीच्या गोळ्याही चालवल्या. देहलीच्या जहांगीरपुरीमध्ये, तर बांगलादेशी घुसखोरांच्या साहाय्याने सुनियोजितपणे दगडफेक केली. देशभरात शोभायात्रांवर आक्रमणे होत असतांना हिंदुविरोधी ‘सेक्युलर ब्रिगेड’ (धर्मनिरपेक्षतावादी समूह) शांत होती; परंतु धर्मांधांची अवैध बांधकामे बुलडोझरने पाडणे जसे चालू केले, तसे हे सर्व हिंदुद्रोही अचानक उठून उभे राहिले. ते हिंसाचारग्रस्त क्षेत्रात पोचले आणि तेथील लोकांना प्रक्षुब्ध करण्याचा प्रयत्न केला.

२. ‘सेक्युलर’ टोळ्यांनी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारावर पडदा टाकण्यासाठी सतत हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करणे

श्री. विजय तिवारी

दंगली घडवणाऱ्या क्रूर जिहाद्यांच्या हिंसक पापांवर पडदा टाकून पीडित हिंदूंनाच दोषी ठरवण्याचा उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून ही ‘सेक्युलर’ टोळी करत आली आहे. वर्ष १९९० मध्ये सहस्रो काश्मिरी हिंदूंना ठार मारण्यात आले, शेकडो महिलांवर बलात्कार करण्यात आले आणि त्यामुळे लक्षावधी हिंदु कुटुंबांना घरदार सोडावे लागले, तेव्हा ही टोळी शांत होती. जेव्हा काश्मिरी हिंदूंवर झालेल्या आक्रमणांची सार्वजनिकरित्या टीका होऊ लागली आणि त्यांच्या पुनर्वसनाची चर्चा होऊ लागली, तेव्हा संपूर्ण ‘सेक्युलर’ टोळी पुन्हा सक्रीय झाली. काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या चर्चेऐवजी रा.स्व. संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या दिशेने चर्चा वळवण्यात आली. बाबरी विध्वंस प्रकरण ताजे ठेवून काश्मीरचा नरसंहार झाकण्याचे काम तीन दशके सतत चालू राहिले.

३. ‘सेक्युलरवाद्यां’नी पीडित हिंदूंना दोषी ठरवून त्यांनाच आरोपी म्हणून उभे करणे

गुजरातच्या ‘साबरमती एक्सप्रेस’च्या एका डब्याला रेल्वेगाडीपासून वेगळे करून त्यातील ५९ कारसेवकांना जाळून ठार करण्यात आले, तोपर्यंत ही ‘सेक्युलर’ टोळी चूप होती. या निर्घृण घटनेला जेव्हा हिंदूंनी प्रतिक्रिया देण्यास प्रारंभ केला, तेव्हा या टोळीने आकाशपाताळ एक केले. हा गोंधळ दोन दशके चालू राहिला. गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना डझनावारी ‘एस्.आय.टी.’चा (विशेष अन्वेषण पथकाचा) सामना करावा लागला. गृहमंत्र्यांना राज्य सोडावे लागले, तर कॅबिनेट मंत्री माया कोडनानी यांना मंत्रीपद सोडावे लागले. २० जुलै २०१२ या दिवशी आसाममध्ये स्वदेशी बोडो जनजातीच्या विरोधात बांगलादेशी घुसखोरांनी हिंसाचार चालू केला. जोपर्यंत बोडो जनता अत्याचार सहन करत होती, तोपर्यंत सर्व सेक्युलरवाले गप्प होते; परंतु जेव्हा बोडो जनतेने प्रतिकार करून घुसखोरांशी संघर्ष चालू केला, तेव्हा हिंदूंना दोषी ठरवण्यात आले.

४. राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले असतांना अल्पसंख्यांकांना अधिक महत्त्व दिले जाणे

आताही शोभायात्रांवरील आक्रमणात हिंदू मार खात राहिले, तोपर्यंत एकाही सेक्युलरवाद्याला त्याची जाणीव झाली नाही. जेव्हा हिंदूंनी आक्रमणाला प्रत्युत्तर देणे चालू केले, तेव्हा सेक्युलर परिवार, जे.एन्.यू.ची डफली (साम्यवादी) टोळी, मार्क्सवादी-माओवादी, जिहादी, ‘आप’वाले आणि काँग्रेसवाले असे सर्व उठून उभे राहिले. घटना तर अनेक आहेत; परंतु गोष्ट एवढीच आहे की, रक्ताचा रंग पालटत का रहातो ? भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्यांकांना मताधिकार किंवा जनाधार यांचे महत्त्व हिंदूंहून अधिक का आहे ? हिंदूंचे मौलिक अधिकार अन्य मतावलंबी आणि अल्पसंख्यांक यांच्याहून अल्प आहेत का ? जर आपल्या राज्यघटनेने जगण्याचे सर्वांना समान अधिकार दिले आहेत, कोणताही भेदभाव न करता समानतेचा अधिकार दिला आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि सर्वांना सारख्या स्वरूपात अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, तर मग हिंदूंच्या दु:खावर गप्प रहाणे आणि जिहादींच्या दु:खांवर आरडाओरड करणे योग्य आहे का ? याचे उत्तर सेक्युलर टोळीला द्यावे लागेल !

– श्री. विजय शंकर तिवारी