अमरावती येथील एका रेल्वेच्या मार्गाची मालकी अजूनही ब्रिटिशांकडे !

प्रतिवर्षी १ कोटी २० लाखांचा द्यावा लागतो कर !

अमरावती – भारतात प्रतिदिन सहस्रो रेेल्वेमधून लाखो लोक प्रवास करतात; मात्र देशातील सर्व रेल्वे मार्गांची (ट्रॅक) मालकी भारत सरकारकडे नाही. अमरावती जिल्ह्यात एक रेल्वेचा मार्ग असून त्याचा ताबा आजही ब्रिटिशांकडे आहे. या मार्गावर रेल्वे चालवण्यासाठी भारतीय रेल्वे ब्रिटनच्या ‘क्लिक निक्सन’ नावाच्या खासगी आस्थापनाला वर्षाला १ कोटी २० लाख रुपयांचा कर देते.

१. या मार्गावर धावणार्‍या शकुंतला एक्सप्रेसमुळे याला ‘शकुंतला रेल मार्ग’ असेही म्हणतात. वर्ष १९०३ मध्ये क्लिक निक्सन या ब्रिटिश आस्थापनाच्या वतीने हा रेल्वे मार्ग बनवण्याचे काम चालू करण्यात आले. या मार्गाचे काम वर्ष १९१६ मध्ये पूर्ण झाले.

२. हे आस्थापन आज ‘सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनी’ म्हणून ओळखले जाते. त्या काळी अमरावतीचा परिसर कापसासाठी देशभरात प्रसिद्ध होता. मुंबई बंदरात कापूस नेण्यासाठी ब्रिटिशांनी हा मार्ग बांधला होता.

३. त्या काळी केवळ खासगी आस्थापनेच रेल्वेचे जाळे पसरवण्याचे काम करत असत. आजही हा मार्ग ब्रिटनच्या या आस्थापनाच्या कह्यात आहे. त्याच्या देखभालीचे संपूर्ण दायित्व त्यांच्यावर आहे. ‘प्रतिवर्षी कर देऊनही हा मार्ग अतिशय जीर्ण झाला आहे. गेल्या ६० वर्षांपासून त्याची डागडुजीही झालेली नाही’, असे रेल्वेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. (खासगी आस्थापन मार्गाची दुुरुस्ती करत नसेल, तर त्यांना रेल्वे प्रशासन कर कसा देते ? – संपादक)

४. या मार्गाच्या वाईट अवस्थेमुळे त्यावर चालणार्‍या जे.डी.एम्. मालिकेतील डिझेल लोको इंजिनचा कमाल वेग २० किमी प्रतीघंटा ठेवावा लागतो. या रेल्वे मार्गावरील सिग्नल आजही ब्रिटिशकालीन आहेत. येथून धावणार्‍या शकुंतला एक्स्प्रेस रेल्वेमधून प्रतिदिन सहस्रोंहून अधिक लोक प्रवास करतात.

संपादकीय भूमिका

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली असतांनाही भारतातील रेल्वे मार्ग ब्रिटिश आस्थापनाच्या कह्यात असणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !