तमिळनाडूतील देवसहायम् पिल्लई यांना व्हॅटिकनकडून ‘संत’ घोषित

देवसहायम् पिल्लई व पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – येथे १५ मे या दिवशी झालेल्या एका कार्यक्रमात ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी भारतातील तमिळनाडूतील १८ व्या शतकात धर्मांतर केलेले देवसहायम् पिल्लई यांना संत घोषित केले. देवसहायम् यांच्यासह ९ जणांना या कार्यक्रमात संत घोषित करण्यात आले. यात ४ महिलांचाही समावेश आहे. पिल्लई हे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना संत घोषित करण्यात आले आहे. या वेळी भारतियांच्या समुदायाने तिरंगा ध्वज फडकावत आनंदोत्सव साजरा केला.

कोण आहेत देवसहायम् ?

देवसहायम् यांचा जन्म २३ एप्रिल १७१२ या दिवशी हिंदु नायर कुटुंबात झाला. ते तत्कालीन त्रावणकोर राज्याचा भाग असलेल्या कन्याकुमारी येथील नट्टालम् येथील रहिवासी होते. त्रावणकोरचे महाराजा मरतड वर्मा यांच्या दरबारात अधिकारी होते. डच नौदल कमांडरने त्यांना कॅथलिक ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली.