गडचिरोली येथे पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या !

गडचिरोली – पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना १४ मे या दिवशी उघडकीस आली. रामजी तिम्मा (वय ४० वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तिम्मा हे एटापल्ली तालुक्यातील मेंढरी या गावातील रहिवासी आहेत.

नक्षलवाद्यांनी हत्या करून मृत शरिराजवळ टाकलेल्या पत्रकात रामजी तिम्मा हा आत्मसमर्पित नक्षली असून पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशय व्यक्त केला आहे. ‘यापूर्वी झालेल्या एका घटनेत पोलिसांना सहकार्य करत एका नक्षल कमांडरला मारण्यात तिम्मा याचा हात होता’, असा पत्रकात उल्लेख केलेला आहे. नक्षलवाद्यांनी अतीदुर्गम भागात हत्या आणि मारझोड पुन्हा चालू केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादकीय भूमिका

संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत, हे सरकारी यंत्रणांच्या लक्षात कसे येत नाही ? नक्षलवादाचा बीमोड करण्याया दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !