चंद्रावरील मातीत रोप उगवण्यात वैज्ञानिकांना यश !

वॉशिंग्टन (अमेरिका) – कोणत्याही भूमीमध्ये वनस्पती उगवायला ती भूमी सुपीक असणे आवश्यक असते. चंद्राचे संशोधन करणार्‍या ‘नासा’ या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. या संशोधनाच्या वेळी ‘फ्लोरिडा विश्‍वविद्यालया’च्या वैज्ञानिकांच्या एका गटाने चंद्रावरील मातीत रोप उगवण्यामध्ये यश संपादन केले आहे. हे संशोधन एका अहवालात प्रकाशित करण्यात आले आहे.

१. चंद्राच्या पृष्ठभागावरील माती ही दगडांनी युक्त आहे. तरी ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी विविध ‘अपोलो मिशन्स’च्या वेळी एकूण ३८२ किलो वजनाचे दगड तेथून पृथ्वीवर आणले. ते विविध वैज्ञानिकांना संशोधनासाठी वाटण्यात आले.

२. अमेरिकेतील फ्लोरिडा विश्‍वविद्यालयातील एना-लिसा पॉल आणि प्रा. रॉबर्ट फर्ल यांनी हे संशोधन केले असून त्यांना चंद्राची केवळ १२ ग्रॅम माती मिळाली होती. त्यांनी ११ वर्षे संशोधन करून चंद्राच्या मातीत रोप उगवले.

३. पॉल म्हणाल्या की, याआधीही अशा प्रकारे रोप उगवण्यात आले होते; परंतु त्या वेळी बियाण्यांवर चंद्राची माती केवळ शिंपडण्यात आली होती. या वेळी मात्र प्रत्यक्ष चंद्राच्या मातीतच रोप उगवले. या रोपांना पृथ्वीवरील हवा आणि पाणी देण्यात आले.