गोव्यातील कुप्रसिद्ध इन्क्विझिशन (धर्मसमीक्षण सभा) आणि कॅथॉलिकांमधील जातीभेद

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी एक डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. १३ मे या दिवशी आपण ‘गोव्यातील ख्रिस्ती धर्मसभेचे आदेश!’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.

१३. भारतीय रीती-रिवाजांचा ऱ्हास

डॉ. टी.बी. कुन्हा

‘पोर्तुगिजांच्या असहिष्णुतेने घडवून आणलेले पालट धार्मिक व्यवहारांपुरतेच मर्यादित नव्हते. त्यांनी भारतीय लोकांची सामान्य जीवनातील पद्धत आणि त्यांच्या पारंपरिक रूढी यांतही ढवळाढवळ केली. त्यांच्या स्थानिक हवामानाला अनुकूल नसलेल्या परकीय आणि विचित्र रिती त्यांच्यावर लादल्या. गोव्यातील लोकांचे रिती-रिवाज पालटण्यात ‘होली इन्क्विझिशन’ हे शस्त्र सगळ्यात अधिक कामी आले. गोव्यात ते अडीचशे वर्षे अस्तित्वात होते. त्याची तीव्रता, काही इतिहासकारांच्या दाव्यानुसार ख्रिस्त्यांनाच नव्हे, तर हिंदूंनाही जाचक ठरली. त्याचे आदेश, डिक्री, धार्मिक हुकूमनामे यांचे उल्लंघन केल्यास ख्रिस्त्यांना त्याच्या ट्रायब्युनलपुढे (न्यायाधीकरणाच्या पुढे) आणण्यात येई, तर हिंदूंना तथाकथित चेटूक, जादूटोणा, वगैरे गुन्ह्याकरता ट्रायब्युनलपुढे आणण्यात येई. दोघांकडूनही भरपूर पैसे उकळले जायचे. फ्रेंच प्रवासी डिलन आणि पिरार्ड यांनीसुद्धा त्याचे वर्णन केले आहे.’ (पृष्ठ क्र. ३९)

१४. कॅथॉलिकांमध्ये अद्यापपर्यंत असलेली जातीयता

‘सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदी रिती-रिवाजांवर निर्दयपणे घाव घालणाऱ्या या धार्मिक सुधारकांनी हिंदु धर्मातल्या जातीव्यवस्थेत मात्र हस्तक्षेप केला नाही. ती जातीयता कॅथॉलिक धर्मात तशीच अस्तित्वात राहिली. इतकेच नव्हे, तर काही कॅथॉलिकांमध्ये विशिष्ट जातीच्या लोकांनाच प्रवेश दिला जातो, जणू काय दुसऱ्या जातीच्या व्यक्तीने प्रवेश केल्यास संस्था दूषित होईल. खरेतर पोर्तुगिजांनी हिंदु जाती तशाच ठेवल्या, इतकेच नव्हे, तर त्यात युरोपियन आणि त्यांच्या वंशजापासून निर्माण झालेली जात या एका नव्या जातीची भर घातली. तिला सगळ्यात जास्त मानाचे स्थान दिले गेले.’

‘एका सरकारी कौन्सिलने काढलेल्या कायद्याद्वारे ‘जन्मामुळे हक्क’ शाबित होतो, या सबबीवर हिंदी कॅथॉलिक समाजात अस्तित्वात असलेले जातीय हक्क नष्ट केले; पण त्यातून फक्त गोऱ्या लोकांचा समाज मात्र वगळला. सगळीकडे साम्राज्यवाद्यांना हिंदी जातींमधल्या असमानतेबद्दल धक्का बसतो; पण आपल्या लोकांपुरते मात्र ती मान्य करतात. ख्रिस्त्यांच्या तत्त्वात हा घोर अन्याय बसत नसला, तरीही जातीयता तशीच ठेवण्यात राज्यकर्त्यांचे राजकीय इप्सित साध्य होत होते; कारण त्यामुळे कॅथॉलिक विभागले जाऊन त्याचा लाभ घेणे सोपे व्हायचे. गोव्याच्या तिसऱ्या कौन्सिलने चौथ्या ॲक्टच्या तिसऱ्या डिक्रीद्वारा आदेश दिला की, कॅथॉलिक पाद्री उच्च जातीतील लोकांमधूनच निवडावे. कॅथॉलिक पाद्री हे उच्च, सन्माननीय आणि सच्छील जातकुळीचे असावेत, म्हणजे इतर ख्रिश्चन त्यांना मान देतील.’ (पृष्ठ क्र. ४०-४१)

‘प्रो. बोहवमर म्हणतात, ‘‘जेजुईटांच्या मलबार मिशनमध्ये मरणाऱ्या अस्पृश्य व्यक्तीला कम्युनियन नाकारण्याचा आणि ‘होस्ट’ (युखरिस्टचा ब्रेड) एका दांड्याच्या टोकाला बांधून त्याला देण्याचा किंवा त्याच्या दारात ठेवण्याचा हक्क पाद्रीला देण्यात आला होता.’’ आतासुद्धा कॅथॉलिक आपल्या जातीबाहेर लग्न करत नाहीत आणि जातीयतेला ते हिंदूंइतकेच अट्टाहासाने चिकटून आहेत, ही वस्तुस्थिती आहे. गोव्याचे पाश्चात्तीकरण म्हणजे वरवरचे केवळ ढोंग आहे. गोवेकरांचे पाश्चात्तीकरण दास्यत्वाची वृत्ती आहे.’ (पृष्ठ क्र. ४१)

(लेखातील दिलेले पृष्ठ क्रमांक ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ या पुस्तकातील आहेत. इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)