जालना येथे विवाहाच्या आमिषाद्वारे फसवणूक करणारी टोळी अटकेत !

मुख्य आरोपी पसार, तर ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

जालना – टेंभुर्णी पोलिसांनी २ दलाल आणि ४ वधू यांना जाफराबाद तालुक्यातील सातेफळ गावात अटक केली आहे. तेथील शेतात काही लोक संशयितरित्या जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस तेथे गेल्यानंतर काहींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना कह्यात घेऊन चौकशी केल्यावर विवाहाचे आमीष दाखवून फसवणूक करण्यात येत असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी सविता माळी ही पसार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणी सविता माळी, अनिल माळी, अनिल बनकर या दलालांसह सुनीता माळी, सुषमा बेळगे, शीला बनकर आणि शीतल निकम यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला.

सविता माळी हिने संभाजीनगर येथील काही मुलींना विवाहासाठी सिद्ध केले. विवाहास इच्छुक असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील २ तरुणांना विवाह लावून देण्याचे आमीष दाखवले. त्यासाठी २ लाख रुपये घेण्याचे ठरले. विवाहासाठी दोघांच्याही कुटुंबाना बोलावून घेतले; मात्र एकाच वेळी दोन्ही वर पक्ष समोरासमोर आले. दोन्ही पक्षाला एकच वधू पसंत पडली. त्यामुळे वाद निर्माण झाला. तेव्हा फसवणूक होत असल्याचे समजले. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या भ्रमणभाषची पडताळणी केल्यावर त्यात अनेक मुला-मुलींची वैयक्तिक माहिती आणि छायाचित्रे आढळून आली आहेत. या टोळीने धुळे, संभाजीनगर, जळगाव, परभणी आणि नांदेड या शहरांत विवाह करण्यास इच्छुक असलेले तरुण अन् त्यांचे नातेवाईक यांची आर्थिक फसवणूक केल्याचे अन्वेषणात समोर आले आहे.