उज्जैन येथील मशिदीखाली शिवमंदिर ! – महामंडलेश्‍वर अतुलेशानंद

मशिदीचे सर्वेेक्षण आणि चित्रीकरण करण्याची मागणी !

उजवीकडे आखाड्याचे महामंडलेश्‍वर आणि ‘अखंड हिंदु  सेने’चे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलेशानंद

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील दानी गेट येथे असणार्‍या मशिदीच्या खाली भगवान शिवाचे मंदिर आणि श्रीगणेशाची मूर्ती आहे, असा दावा ‘आवाहन’ आखाड्याचे महामंडलेश्‍वर आणि ‘अखंड हिंदु  सेने’चे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलेशानंद यांनी केला. त्यांनी या मशिदीचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण करावे जेणेकरून सर्व काही उघड होईल, अशी मागणी केली. जर प्रशासनाने असे केले नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ, अशी चेतावणीही त्यांनी दिली. वर्ष २००७ मध्ये मी स्वतः या मशिदीत जाऊन या गोष्टी पाहिल्या आहेत, असाही दावा त्यांनी केला.

महामंडलेश्‍वर अतुलेशानंद पुढे म्हणाले की, परमार काळातील राजा भोज यांचे चित्र, भगवान शिव आणि श्रीगणेश यांच्या मूर्ती तेथे आहेत, तसेच हत्ती, घोडे, सैनिक आदींच्याही मूर्ती आहेत. जोपर्यंत सर्वेक्षण आणि चित्रीकरण केले जात नाही, तोपर्यंत या वस्तूंशी कुणीही छेडछाड करू नये. ग्वाल्हेर येथे या मशिदीची कागदपत्रे आहेत, ती मागवण्यात यावीत. त्यातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील.