तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार !
ठाणे, १० मे (वार्ता.) – मुंब्रा पोलिसांवर तब्बल ६ कोटी रुपये वसुलीच्या आरोपाचे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची पोलीस उपायुक्तांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे. यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई होईल, असे ठाणे शहर सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.
ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग, तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिलेल्या संबंधित पत्रात म्हटले आहे…
१. १२ एप्रिल २०२२च्या रात्री १२ ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीतराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक शेवाळे, काळे आणि मदने, तसेच अन्य तीन खासगी व्यक्ती यांनी पोलिसांच्या गाडीमधून मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीमधील फैजल मेमन यांच्या घरी धाड टाकली.
२. धाडीत मेमन यांच्या घरात ३० कोटी रुपयांची रोकड सापडली. प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे ३० खोक्यांमध्ये ३० कोटी रुपये होते. हा काळा पैसा असून तुमच्यावर कारवाई होईल, तो सर्व पैसा जप्त होईल’, अशी भीती उपस्थित अधिकाऱ्यांनी मेमन यांना दाखवली. सर्व पैसे जप्त करून त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
३. मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच ३० कोटींचे ३० खोके ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेमन यांना पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागितले. पोलिसांच्या दबावाला बळी पडून मेमन २ कोटी देण्यास सिद्ध झाले. त्यावर ‘२ कोटी घेतो, उर्वरित पैसे परत करतो’, असे पोलिसांनी सांगितले; मात्र प्रत्यक्षात २ ऐवजी ६ कोटी रुपये त्यातून काढण्यात आले. उर्वरित २४ कोटी मेमन यांना परत करण्यात आले. एवढे पैसे का घेतले, असे मेमन यांनी विचारल्यावर त्यांना लाथा मारून बाहेर काढण्यात आले.