कर्नाटकमध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात श्रीराम सेनेकडून हनुमान चालिसाचे पठण

१ सहस्र मंदिरांवरील भोंग्यांवरून पहाटे ५ वाजता लावली हनुमान चालिसा !

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात श्रीराम सेनेने ९ मेपासून आंदोलन चालू केले आहे. राज्यातील सुमारे १ सहस्र मंदिरांमध्ये पहाटे ५ वाजल्यापासून भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्यात आले होते. राज्यातील विशेष करून विजयपूर, मैसुरू, बेळगाव आदी जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन चालू करण्यात आले. श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी राज्यातील १ सहस्रांहून अधिक मंदिरांवरील भोंग्यांद्वारे हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन केले होते. त्यांनी राज्य सरकारला ८ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याची समयमर्यादा दिली होती; मात्र त्यानुसार सरकारने कृती न केल्याने त्यांनी हे आंदोलन चालू केले आहे. भोंग्यांवरून राज्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भोंगे लावण्यात आलेल्या १ सहस्र मंदिरांबाहेर अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचसमवेत  राज्यभरात पोलिसांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्यांनाही तशी सूचना देण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे धाडस दाखवा ! – प्रमोद मुतालिक

श्री. प्रमोद मुतालिक प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे धाडस दाखवले पाहिजे. त्यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरून अवैधरित्या लावण्यात आलेले भोंगे काढण्यास बाध्य केले. तसेच अनुमतीनुसार आवाजाची मर्यादा राखण्यास सांगितली. न्यायालयाचा आदेश असूनही कारवाई न झाल्याने लोकांचा सरकारच्या विरोधात रोष आहे. आमच्या आंदोलनाच्या विरोधात पोलिसी बळाचा वापर करण्याची चेतावणी प्रशासनाने दिली आहे. या चेतावणीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. प्रशासनाने अशी दादागिरी आमच्यावर नाही, तर मशिदींवर अवैध भोंगे लावणार्‍यांच्या विरोधात करून दाखवावी. सरकारने हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही हिंदूंच्या मतांमुळे सत्तेवर आलेला आहात. आम्ही नमाज आणि अजान यांच्या विरोधात नाही.

कर्नाटकच्या ६०० मशिदींना भोंग्यांविषयी नोटिसा

कर्नाटक सरकारने भोंग्यांविषयी राज्यातील मशिदींना नोटिसा पाठवल्या आहेत.  मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजावरून या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. सरकारने सांगितले की, श्रीराम सेना आणि बजरंग दल यांच्या अभियानाच्या आधीच मशिदींवरील भोंग्यांचा आवाज निश्‍चित करण्यासाठी प्रक्रिया चालू झाली होती.