राज्यातील ३५ लाख ९२ सहस्र ९२१ विद्यार्थ्यांना मिळणार विनामूल्य गणवेश !

मुंबई – समग्र शिक्षा अंतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात राज्यातील ३५ लाख ९२ सहस्र ९२१ विद्यार्थ्यांना विनामूल्य गणवेश वाटप करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून २१५ कोटी रुपयांचा निधीही संमत झालेला आहे.

विनामूल्य गणवेशाची योजना लागू !

शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांच्यासाठी विनामूल्य गणवेशाची योजना लागू आहे. समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना आणि अंदाजपत्रक यांसाठी केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीत निधी व्ययास मान्यता देण्यात आलेली आहे.

प्रति २ गणवेशांसाठी ६०० रुपयांच्या निधीची तरतूद !

प्रति गणवेश ३०० रुपये याप्रमाणे २ गणवेशांसाठी प्रती विद्यार्थी ६०० रुपये याप्रमाणे निधीची तरतूद झालेली आहे. गणवेश योजनेची संमत तरतूद शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने व्यय करावी लागणार आहे. केंद्र, तालुका आणि जिल्हास्तर यांवरून संमत केलेली तरतूद व्यय करता येणार नाही, अशी सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली आहे.