पाकिस्तानची तालिबान्यांविषयीची रणनीती त्याच्यावरच उलटणे !

पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामी कट्टरपंथियांना संरक्षण दिले जात आहे, हे उघड सत्य आहे. वर्ष २००१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य उतरल्यानंतर तालिबानच्या नेतृत्वातील अनेकांना पाकिस्तानात आश्रय देण्यात आला. वर्ष २०२१ मध्ये तालिबानने काबुलची सत्ता कह्यात घेतली. त्या वेळी त्यांची नवी राजवट स्वीकारण्यामध्ये इस्लामाबाद (पाकिस्तान) सगळ्यात पुढे होते.

आज पाकिस्तानची ‘गुड (चांगले) तालिबान-बॅड (धोकादायक) तालिबान’ रणनीती त्यांच्यावरच उलटली आहे. अनेक दशकांपासून पाकिस्तानने ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’वर (‘टीटीपी’वर) कारवाई करतांना अफगाण तालिबानला पाठिंबा देण्याचे धोरण अवलंबले आहे. या कालावधीत अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ नवीन आघाडी उघडत आहे.

१. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण होत असणे

अफगाणिस्तान तालिबान पुरस्कृत ‘टीटीपी’कडून वारंवार होणाऱ्या आक्रमणांमुळे आधीच त्रस्त असणाऱ्या पाकिस्तानला तालिबानने आणखी त्रासले आहे. वारंवार विनंती करूनही तालिबान ‘टीटीपी’वर कठोर कारवाई करत नसल्याचा इस्लामाबादला राग आहे. १६ एप्रिल २०२२ या दिवशी जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सीमेपलीकडून हवाई आक्रमण करण्यात आले आणि त्यात ४७ अफगाणी लोकांचा मृत्यू झाला. त्या वेळी तालिबानने पाकिस्तानवर आक्रमण केल्याचा उघड आरोप केला. खोस्तमधील पाकिस्तानी हवाई आक्रमणाचा निषेध करत पाकिस्तानविरोधी घोषणा देत निदर्शने करण्यात आली. ‘आमच्या संयमाचा अंत बघू नका’, अशी थेट धमकी तालिबानने इस्लामाबादला दिली आहे. एकीकडे ‘तालिबान पाकिस्तान-अफगाण सीमेवरून आतंकवाद्यांना हटवत आहे’, असे अहवाल पाकिस्तानी प्रिंट मिडिया छापत असली, तरी हे सारासार खोटे आहे. एकंदरच तालिबान-पाकिस्तान माया पातळ झाली आहे.

२. बलुच फुटीरतावाद्यांनी पाक सैन्यावर आक्रमण करणे आणि ग्वादर बंदरासाठी चीन अन् पाक सरकार यांविरोधी आंदोलन करणे

अलिकडच्या काळात बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमधील पंजगूर आणि नुष्की लष्करी छावण्यांवर जोरदार आक्रमण करत पाकिस्तानी लष्कराच्या नाकीनऊ आणले होते. या आक्रमणात १०० हून अधिक पाक सैनिक मारल्याचा दावा बलुच लिबरेशन आर्मीने केला. पाकिस्तानमध्ये चिनी गुंतवणूक सुरक्षित नसल्याच्या बलुच फुटीरतावाद्यांनी दिलेल्या चेतावणीनंतर चिनी गुंतवणुकांवर अनेक आक्रमणे करण्यात आली. ‘ग्वादर को हकूक दो तहरीक’ (ग्वादर बंदराला अधिकार प्रदान करण्यासाठी होणारे आंदोलन) म्हणत देशव्यापी निषेध केला गेला. केवळ ग्वादर किंवा जवळपासच्या शहरांतील लोकांचा समावेश नव्हता, तर संपूर्ण बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील अनेक लोकांनी त्यात भाग घेतला. हा निषेध सरकारच्या विरोधात होताच; पण सगळ्यात आधी तो चीनच्या वाढत्या प्रभावाला होता.

३. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये आतापर्यंत केलेली आक्रमणे

याआधीही वर्ष २०१८ मध्ये झालेले चिनी दूतावासावरील आक्रमण, वर्ष २०२० मध्ये कराचीमध्ये पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर आक्रमण (‘बलुचिस्तानमध्ये चीन राबवत असलेल्या विविध योजनांद्वारे शोषण करत आहे’, असे सांगत बलुच लिबरेशन आर्मीने त्याचा सूड म्हणून आक्रमण केले, असा दावा केला होता.) वर्ष २०२१ मध्ये उत्तर पाकिस्तानमधील हायड्रो-पॉवर प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी चिनी अभियंत्यांना घेऊन जाणाऱ्या बसमधील स्फोट (यात ९ चिनी नागरीकांचा मृत्यू झाला) आणि २६ एप्रिल २०२२ या दिवशी कराची विद्यापिठाजवळ बलुचने घडवून आणलेल्या स्फोटात ३ चिनी नागरिकांसह ४ जण ठार झाले.

४. पाकने काश्मीरविषयीचे स्वप्न बघण्यापेक्षा देशांतर्गत फुटीरतेकडे लक्ष द्यावे !

पाकिस्तानातील राजकीय, सामाजिक, आर्थिक अस्थिरता त्यांना कुठे घेऊन जाईल ठाऊक नाही; पण तेथे माजलेल्या अराजकतेने आणि अंतर्गत फुटीरतेने त्यांची आधीच झोप उडालेली आहे. असे असतांना निदान आता तरी त्यांनी काश्मीर कह्यात घेण्याचे स्वप्न बघणे सोडून द्यावे, नाही तर जे आहे तेही गमावावे लागेल.

– अक्षता बापट

(साभार : सामाजिक संकेतस्थळ)