चीनमध्ये कोरोनामुळे २६ शहरांत दळणवळण बंदी

वुहान (चीन) – यावर्षी चीनमध्ये १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात आला नाही; कारण चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. देशातल्या २६ शहरांमध्ये अगदी कडक दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे २१ कोटी नागरिक त्यांच्या घरांमध्ये एकप्रकारे बंदीवासात आहेत. अशी स्थिती असतांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी याविषयी जनतेशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला नाही किंवा नागरिकांना दूरचित्रवाणीवरूनही संबोधित केले नाही. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्राचे माजी संपादक डेंग यूवेन यांच्या मते, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी जिनपिंग कोरोनाविषयी बोलणे टाळत आहेत.

दुसरीकडे सरकारने सुमारे ७५ लाख सरकारी कर्मचार्‍यांची नियुक्ती साहाय्यता कार्यासाठी केली; मात्र हे कर्मचारीदेखील अल्प पडत असल्यामुळे जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या सुमारे ५० लाख कार्यकर्त्यांनाही याच कामासाठी मैदानात उतरवले आहे. चीनच्या कित्येक शहरांमध्ये अगदी खाण्या-पिण्याच्या गोष्टींसाठीदेखील नागरिकांना सरकारी साहाय्यावर अवलंबून रहावे लागत आहे.