आवश्यकता वाटल्यास राज ठाकरे यांच्यावर कारवाई करणार ! – पोलीस महासंचालक

डावीकडून पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाचे अन्वेषण संभाजीनगरचे पोलीस आयुक्त करणार असून आवश्यकता वाटल्यास त्यांच्यावर आजच कारवाई करण्यात येईल. याविषयीची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी ३ मे या दिवशी दिली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह बैठक झाल्यावर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सिद्ध आहे’, असेही त्यांनी सांगितले.

रजनीश सेठ पुढे म्हणाले की,

१. कुणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल. ‘केंद्रीय राखीव पोलीस दला’च्या (सी.आर्.पी.एफ्.) ८७ तुकड्या आणि ३० सहस्रांपेक्षा अधिक गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

२. पोलिसांच्या सुट्या रहित करण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर आहेत. (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अगोदरच अवैध भोंगे उतरवले असते, तर आज ही वेळ आली असती का ? याचे आत्मपरीक्षण पोलीस-प्रशासनाने करावे ! मुळात अशी परिस्थिती निर्माण होण्यास उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांवर काय कारवाई करणार, हेही प्रशासनाने सांगावे. – संपादक)

मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पोलिसांकडून नोटिसा !

राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या जात आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटिसा पाठवल्या आहेत. तेढ निर्माण होईल, असे कुठलेही कृत्य करू नये, यासाठी पोलिसांनी या नोटिसा पाठवल्या आहेत.