समाजमाध्यमे ही दुधारी शस्त्रे असून ती डोकेदुखी झाली आहे ! – अजित पवार

अजित पवार

पुणे – महाराष्ट्रातील ऐक्य आणि सलोखा टिकून रहाण्यासाठी माध्यमांनी नको त्या मुद्याला अनावश्यक महत्त्व देणे टाळावे. त्यामुळे जातीय ध्रुवीकरण करून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, यासाठी समाजमाध्यमांनी बातमी प्रसारित करण्यापूर्वी तिची शहानिशा करणे आवश्यक आहे. वेगाने माहिती प्रसारित करणारी समाजमाध्यमे ही दुधारी शस्त्रे आहेत; मात्र ती समाजमाध्यमे आता डोकेदुखी बनली आहेत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘पत्रकार’ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, ‘‘मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे आणि आता समाज माध्यमे असे स्थित्यंतर होत असतांना पत्रकारितेची मूल्ये हरवणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे. आता डिजिटल आणि समाजमाध्यमांना वळण आणि शिस्त लावण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसवण्याची वेळ आली आहे.’’

संपादकीय भूमिका

समाजमाध्यमांना डोकेदुखी होऊ न देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा आधारस्तंभच असायला हवा, याकडे समाजमाध्यमे लक्ष देतील का ?