पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या नवर्‍याने ३ विवाह करावेत, असे तिला वाटत नाही. देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असतांना मुसलमान महिलांना सन्मानाचे आयुष्य देण्यासाठी समान नागरी कायदा लागू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुसलमान महिलांच्या आयुष्यात चांगले पालट होतील, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केलेे. ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने समान नागरी कायदा लागू करण्यास विरोध केला आहे. त्यावर मुख्यमंत्री सरमा बोलत होते.

सर्व राज्यांत समान नागरी कायदा व्हावा ! – उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, तेथे आणि जेथे भाजपाची सत्ता नाही त्या राज्यांमध्येही समान नागरी कायदा लागू व्हावा.

सर्वांनी समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली पाहिजे आणि या मागणीचे स्वागत केले पाहिजे; मात्र अनेक ठिकाणी मतांच्या राजकारणासाठी लांगूलचालन करण्यात येत आहे.