पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्र दिले !
मुंबई – नवी मुंबईतील उलवे येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने भूमी देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीचे पत्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ३० एप्रिल या दिवशी देवस्थानचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांच्याकडे तिरुपती येथे जाऊन सुपुर्द केले.
नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वराचे मंदिर हे भाविक आणि पर्यटन यांच्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. देवस्थानाच्या वतीने या परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या वतीने देशात भाग्यनगर, चेन्नई, कन्याकुमारी, बेंगळुरू, विशाखापट्टणम्, भुवनेश्वर, जम्मू, देहली, कुरुक्षेत्र आणि ऋषिकेश येथे शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वरील मागणी करण्यात आली.