उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने घट !

उजनी धरण

सोलापूर – उजनी धरणाचा पाणीसाठा ३० टक्क्यांनी खाली म्हणजेच २९.५१ टक्क्यांवर आला असून धरणात केवळ १५.८१ टी.एम्.सी. उपयुक्त पाणी शिल्लक राहिले आहे. सध्या उजनीतून सोलापूरकरांसाठी पाणी सोडण्यात आले असून बोगदा, कॅनॉल आणि नदीपात्रात असे एकूण ५ सहस्र क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे, तसेच कडाक्याच्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने न्यून होऊ लागला आहे.

मागील वर्षी उजनी धरण १०० टक्के भरल्याने फेब्रुवारी २०२२ पर्यंत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होता; मात्र आतापर्यंत सोलापूरसाठी २ वेळा आवर्तने देण्यात आली आणि सध्याही आवर्तन चालू असल्याने पाणीसाठा झपाट्याने न्यून होऊ लागला असून पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.