कोल्हापूर, १ मे (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात गाभार्यात बसवण्यात आलेली संगमरवरी फरशी काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. सुमारे १६ लाख रुपयांच्या या कामाचा ठेका देण्यात आला आहे. कामगार कोणत्याही यंत्राचा वापर न करता पारंपरिक हत्यारे वापरून फरशी काढणार आहेत.
या संदर्भात अधिक माहिती देतांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे म्हणाले, ‘‘श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात वर्ष १९७६ मध्ये संगमरवरी फरशी बसवण्यात आली होती. ही फरशी येथील खांबांवर आणि खाली बसवली होती. यामुळे नैसर्गिक गारवा बंद होऊन मंदिरात भाविकांना गरम होत होते. त्यामुळे ठिकठिकाणी पंखे बसवण्यात आले होते. ६ मासांपूर्वी एका ठिकाणची फरशी काढून चाचणी केली असता तापमान अल्प होत असल्याचे लक्षात आले. यानंतर प्रशासक, तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अनुमतीने सर्वच फरशा काढण्यात येणार आहेत. यामुळे मूळ दगडी स्वरूपाचे मंदिर लोकांसमोर येत आहे, तसेच आतील तापमानही ८ अंश सेल्सिअसने अल्प होत आहे.’’