वैतरणा नदी ते कन्याकुमारी या भारताच्या पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्याच्या भागाला ‘परशुराम क्षेत्र’ असे म्हटले जाते. भगवान परशुरामांविषयीचा उल्लेख स्कंद पुराण, रामायण, महाभारत आदी ग्रंथांमध्ये आढळून येतो. या ग्रंथांमध्ये परशुरामांनी समुद्राला मागे हटवून जमिनीचा काही भाग देण्याची आज्ञा केली, असा उल्लेख आढळतो.
प्रसिद्ध गोमंतकीय इतिहास संशोधक अनंत रामकृष्ण शेणवी धुमे यांच्या ‘द कल्चरल हिस्टरी ऑफ गोवा फ्रॉम १०००० बी.सी. – १३५२ बी.सी’ या ग्रंथातील ‘जिनेसीस ऑफ द लँड ऑफ गोवा’ या पहिल्या प्रकरणात धुमे यांनी गोवा ही परशुरामभूमी कशी आहे, हे सिद्ध करतांना शिलालेखातील पुराव्यांसमवेत त्यासंबंधी अनेक संशोधकांनी केलेल्या भौगोलिक आणि वैज्ञानिक संशोधनांचे दाखले दिले आहेत.